Beauty Parlor Course: आराध्या ब्युटी पार्लर ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या लाभार्थींला प्रमाणपत्र प्रदान

Beauty Parlor Course: प्रशिक्षण कोर्सच्या माध्यमातून महिलांचे सक्षमिकरण : अण्णासाहेब बेरे




     Beauty Parlor Course: अहमदनगर (प्रतिनिधी):  जन शिक्षण संस्था अहमदनगर जिल्ह्यात 2005पासून व्यवसाय प्रशिक्षणाचे काम करत आहे प्रशिक्षणाची योजना 1967 पासून मुंबई येथून सुरुवात झाली 55 वर्षेया योजनेला झाले आहेत या योजनेचे नाव पूर्वी श्रमिक विद्यापीठ होते 2000 पासून श्रमिक विद्यापीठाचे नाव जन शिक्षण संस्था या नावाने ही योजना ओळखली जात आहे.


 प्रशिक्षणाच्या सर्व योजना 2018 पासून कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. ग्रामीण, शहरी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. यामध्ये आतापर्यंत 35 हजार महिलांना लाभ झाला. प्रशिक्षण कोर्सच्या माध्यमातून महिलांचे सक्षमिकरण होत आहे, असे प्रतिपादन उद्योग केंद्राचे अण्णासाहेब बेरे यांनी केले.


     सावेडी उपनगरात निर्मलनगर येथील आराध्या ब्युटी पार्लर ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे अण्णासाहेब बेरे, निरिक्षक ज्ञानेश्वर खेडकर, नगरसेविका संध्याताई पवार, रुपालीताई वारे, आराध्या ब्युटी पार्लर इन्स्टिट्युटच्या संचालिका सौ.कल्पना पटारे, डॉ.आदिनाथ पटारे, कार्यक्रम समन्वयक सौ.कुंदा शिंदे, ट्रेनिंग सेंटरच्या महिला-युवती उपस्थित होत्या.


     श्री.बेरे पुढे म्हणाले, महिलांमध्ये जिद्द, चिकाटी हे महत्वाचे गुण असतात. त्यामुळे कोणत्याही व्यवसायत त्या आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण करुन यशस्वी होतात. उद्योग-व्यवसायात अडचणी येतात, त्यावर मात करुन पुढे जाण्याचे ध्येय ठेवा. कर्ज घेऊन व्यवसाय करा 25 टक्के सबसिडीचा लाभ घेता येतो.


     यावेळी निरिक्षक ज्ञानेश्वर खेडकर म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यावसायिक प्रशिक्षण घेणार्या महिला व युवतींना विविध योजना आहेत, त्याची परिपूर्ण माहिती घेऊनच अभ्यास करावा म्हणजे लाभ मिळेल.


     जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यवसायात आता महिला मागे राहत नाही. प्रत्येक क्षेत्रात त्या पुढे आहेत. युवतींनी शिक्षण घेऊन घरात बसता कामा नये. स्वत:मध्ये असलेल्या कला-गुणांना वाव द्यावा, त्यासाठी आमची संस्था तुमच्या प्रयत्नांच्या पंखांना बळ देण्याचे काम करीत आहे. महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन चालना देत असल्याचे श्री.पवार म्हणाले.


     यावेळी सौ.कल्पना पटारे म्हणाल्या, प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. समाजातील गरजा ओळखून सेवा दिल्यास उद्योग-व्यवसाय वाढतो. कला-कौशल्य सिद्ध करता येते. यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असे सांगितले.


     नगरसेविका संध्याताई पवार, रुपालीताई वारे यांनी आपल्या भाषणातून प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र घेतलेल्या महिलांना उद्योग-व्यवसायात मार्केटींग, ब्रॅण्ड, भांडवल कसे उपलब्ध करावे. याबाबत मार्गदर्शन केले.


     सूत्रसंचालन जयश्री लोंढे यांनी केले तर सौ.कल्पना पटारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंदा शिंदे, जनशिक्षण संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.