Nashik News: बाजार समिती आवारात बंद मुळे संपूर्ण शुकशुकाट ; राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध बंद
नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाजार तळ, सीमांकित बाजार आवार निर्माण करणे, तसेच अडते, हमाल-मापाडी आदी घटकांविरोधात राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यातील बाजार समित्या बंद पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हमाल-मापाडी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असा आरोप करत या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवारी (ता.२६) बंद पुकारला होता.
यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीही सहभागी झाली, त्यामुळे दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवार व शरदचंद्रजी मार्केट यार्डमध्ये संपूर्ण शुकशुकाट दिसून आला. मात्र काही किरकोळ विक्रीसाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर शेतमाल विक्री केली.
राज्य सरकारने कृषी व पणन कायद्यात बदल केले आहेत. या बदलामुळे शेतकऱ्यांचे, हमाल व मापारी यांचे नुकसान होणार आहे. याविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघाने बैठक घेऊन सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ च्या विधेयक क्रमांक ६४ अन्वये बदल करू नये, अशी मागणी बाजार समितीच्या प्रतिनिधींनी केली.
राज्याच्या पणन संचालनालयाने पणन कायद्यात दुरुस्त्यांसंबंधी २३ फेब्रुवारीपर्यंत सूचना, हरकती मागविलेल्या आहेत. बैठकीत चर्चा होऊन कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित बदल होऊ नये. तसेच २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये सुरू असलेले बदल करू नयेत, अशी मागणी बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करीत शासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद पुकारला होता.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने या संपात सक्रिय सहभाग नोंदविला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवार व शरदचंद्रजी मार्केट यार्ड पूर्णतः बंद होता.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com