निरंकारी मिशनच्या अनुयायींनी पिंपळगांव तलाव परिसरात राबविले ‘स्वच्छ जल.. स्वच्छ मन’ अभियान
अहमदनगर (प्रतिनिधी) - संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या विद्यमाने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायी दिव्य शिकवणुकीला अनुसरुन ‘प्रोजक्ट अमृत’ परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना घाट, दिल्ली येथून करण्यात आला. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजना देशभरातील 1533 ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली. ज्यामध्ये 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला.
मंडळाच्या नगर शाखेच्यावतीने सुद्धा रविवार दि.25 रोजी येथील पिंपळगांव माळवी तलाव येथे जलसफाई अभियान राबविण्यात आले. यामध्ये 150 हून अधिक सेवादलचे महिला व पुरुष सदस्य तसेच अबालवृद्ध निरंकारी भक्तगणांनी भाग घेतला. सकाळी 8 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘सामुहिक प्रार्थना’ म्हणत स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. दु. 12 वाजेपर्यंत तलाव परिसरातून मोठ्या प्रमाणात कचरा, निर्माल्य, प्लॅस्टीक, टाकाऊ वस्तू, पाला पाचोळा गोण्यांमध्ये गोळा करुन कचरा गाड्यांद्वारे त्याची विल्हेवाट लावत परिसर अगदी ‘स्वच्छ’ केला. या उपक्रमाचे जनसामान्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. निरंकारी मिशनचे अनेक सामाजिक उपक्रम इतरांसाठी अनुकरणीय आहेत, अशी भावना मान्यवरांनी याप्रसंगी व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
सद्गुरु माताजींनी ‘प्रोजेक्ट अमृत’ शुभारंभ प्रसंगी आपल्या पावन अशिवर्चनामध्ये सांगितले की, आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे. जल हा आपल्या जीवनाचा मुलभुत आधार आहे. तसेच जल हे परमात्म्याचे वरदान असून, त्याचे अमृता समान रक्षण करावे. परमात्म्याने आपल्याला ही जी सुंदर सृष्टी बहाल केली आहे, त्याला प्रदूषित न करता तिची देखभाल करणे आपले कर्तव्यच आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रुपात प्रतिष्ठापित करुन तिची स्वच्छता करायला हवी. शेवटी त्यांनी सांगितले की, केवळ शब्दातून नव्हे तर आपल्या कर्मातून सांगायला हवे.
या कार्यक्रमप्रसंगी हजारो विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अनेक मान्यवर तसेच भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी निरंकारी मिशनने प्रकृती रक्षणार्थ महत्वपूर्ण पाऊल उचल्याचे सांगितले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com