रयतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तन मन धनाने रयतबरोबर राहिले पाहिजे
सातारा (उद्धव फंगाळ) : आम्ही आज छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्थापनेपासून म्हणजे १९४७ पासून डेटा गोळा करत आहोत. जनरल रजिस्टरच्या आधारे आपण माहितीचे डीजीटायशेन करीत आहोत. जसे आम्ही महाराष्ट्रात प्रथम ७,१२ चे डीजीटायजेशन केले तसेच रयत शिक्षण संस्थेतल्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचे माहितीचे डीजीटायजेशन करून कनेक्शन जोडण्याचे काम आम्ही करीत आहोत. रयतचे अनेक शाखेतले विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही कनेक्ट करीत आहोत.
त्या कामाचा प्रयोग म्हणून रयतच्या छत्रपती शिवाजी कॉलेज पासून आम्ही सुरुवात करीत आहोत. छत्रपती शिवाजी कॉलेजमुळे उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात मुले शिकली.अनेक उंच माणसे कॉलेजने घडविली. लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉ. पतंगरावजी कदम यांच्यासारखी मोठी माणसे येथे घडली आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये वलयांकित माणसांची यादी मोठी आहे. खरोखर छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात इतिहास घडवला आहे’ असे विचार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले .
ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी संघ व कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलत होते.या वेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के,रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.बंडू पवार, प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थी संघातील कार्यकारिणी सदस्य प्राचार्य आर.के.शिंदे, प्राचार्य शहाजी डोंगरे ,प्रा.एम.एस शिंदे ,श्री. वाघमारे, प्रा.प्रल्हाद गायकवाड, प्राचार्य सांगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्था एक मोठा परिवार आहे.या परिवारातील विद्यार्थ्यांचे कनेक्शन निर्माण करण्याची योजना मांडताना ते पुढे म्हणाले की’रयतच्या प्रत्येक तालुका आणि गावात शिकलेली मुले यांच्याशी आम्ही संपर्क करणार आहोत. रयतच्या अनेक मुलांनी देशासाठी योगदान दिले आहे. जे विद्यार्थी शिकून बाहेर पडले त्या सर्वाना जोडून घ्यायचे आहे. आज प्रत्येक कार्यालयाच्या ठिकाणी रयतचे विद्यार्थी मला दिसतात. रयत मधून जे जे मोठे झाले त्या सर्वाना आम्ही भेटणार आहोत. संस्था लोकांच्या सहभागावर उभी राहिलेली असते ,म्हणून लोकांच्या जवळ आपण गेले पाहिजे. कर्मवीर आणि रयत माउली यांच्या पद पथावर आम्ही चालणार आहोत. ७५२ शाखेतल्या सर्व विद्यार्थ्यांना जोडणार.
जगात अनेक मोठी विद्यापीठे आहेत, ती विद्यापीठे माजी विद्यार्थी चालवतात. रयतचे सर्व विद्यार्थी जोडले तर केवढी मोठी शक्ती निर्माण होईल. रयतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तन मन धनाने रयतबरोबर राहिले पाहिजे असे ते म्हणाले.
डॉ.अनिल पाटील म्हणाले ‘कर्मवीर अण्णा शाहू बोर्डिंग मध्ये बसून अनेक स्वप्ने पाहत ‘ग्रेट शिवाजी महाविद्यालय काढण्याचे त्यांचे स्वप्न होते. १९४४ ला एका मुलाच्या लग्नासाठी कर्मवीर मुंबईला गेले तिथे हार्ट अटक आल्याने ते के इ. एम ला होते. तिथे विद्यार्थ्यांच्या साठी कॉलेज काढणार हे ठरवले . डी.पी. भोसले यांनी सुरवातीस ५००० रुपये दिले. गिरणी कामगारांनी मोठे आर्थिक सहकार्य केले. मुंबई विद्यापीठाचा अर्ज भरला, अण्णांना सायन्स कॉलेज काढायचे होते, पण वर्ल्ड वार सुरु झाले,त्यामुळे साधने मिळाली नाहीत .म्हणून मग छत्रपती शिवाजी कॉलेज काढले.
मालोजीराजे यांनी १९३९ ला जी जमीन दिली , तीच पुढे १९४५ ला देणगी दिली. फलटण निवास ही वास्तू दिली. ५००० रुपये दिले . कर्नल ग्रांड डफ यांनी याच कॉलेजमध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिला,अण्णांनी शिवाजी कॉलेजसाठी मोठी माणसे निवडली. मोफत आणि निवासी कॉलेज अण्णांनी सुरु केले. कर्मवीरांच्या वर विश्वास ठेवून छत्रपती शिवाजी कॉलेजला मान्यता दिली. १७ मुलावर कॉलेज सुरु झाले. मोफत आणि निवासी विद्यार्थी असल्याने ४ वर्षात सव्वा दोन लाख तोटा कॉलेजला झाला. मॅथ्यू यांनी कमवा आणि शिका ही योजना सुरु केली. हळूहळू मुले वाढली .त्यामुळे जागा नाही म्हणून माहुलीतील वाड्यात अण्णांनी सोय केली.
कर्मवीर अण्णा केवळ गरीब विद्यार्थ्यांची काळजी घेत नव्हते त्यांच्या आई वडिलाना देखील सांभाळत. अण्णांच्या वेळी केवळ उच्च शिक्षण मिळावे ही अपेक्षा होती. मी सुद्धा याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. गारंबीचा बापू आम्ही शिकत होतो. अनेक आव्हाने कॉलेजने पेलली.विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले होते की, जगात तुमच्यासारखा जमिनीवरचा काम करणारा जबरा गडी मी पाहिला नाही. या कोलेजला मोरारजी देसाई न्यायमूर्ती गजेंद्रगडकर येऊन गेले. जगन्नाथ भोसले, बाळासाहेब देसाई ,क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या हस्ते शिवाजी कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. आज जागतिकीकरणात जग बदलले आहे. या काळात आर्ट कॉलेजचे स्थान काय असणार ? छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये एम.पी.एस .सी आपण सुरु केले .आज ७५० इतके अधिकारी झाले.
आज रयतला सर्वांचे सहकार्य आहे. अधिकारी मुले सहकार्य करत आहेत,रयत एक कुटुंब आहे. आज नोकऱ्या कमी आणि अर्ज जास्त झाले आहेत .आज विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळणार नसेल तर शिक्षणावरचा विश्वास कसा राहील ? पुन्हा पुन्हा परीक्षा घेतल्या जातात. आज ७५ टक्के इंजिनियर यांना कोणी नोकरी देऊ शकत नाही , स्वीपरला २४००० आणि इंजिनियरला १५००० असा पगार असेल तर शिक्षण घेऊन काय मिळाले ? नवीन शैक्षणिक धोरण राबविणारी पहिली कोणती संस्था असेल तर ती रयत आहे.
भाषांतर ,पत्रकारिता,अनुवाद ,मिडिया ,सायबर सेक्युरिटी असू दे सर्व आधुनिक गोष्टी तुम्हालाच शिकाव्याच लागतील. कमीत कमी पाच कौशल्ये घेऊन कॉलेजमधून घ्या .चांगले जगता येईल. खाजगीकरण होत असल्याने शासन जागा भरेल हे सांगता येत नाही. क्वालिटीचे शिक्षण ,व्यवसाय या गोष्टी कालानुरूप विद्यार्थ्यांनी घ्याव्यात .जग बदलते आहे त्या नुसार फक्त रयत बदलते आहे. शिकण्याच्या पद्धती बदल .शिक्षणात ४० टक्के प्रात्यक्षिक असायला पाहिजे.
मल्टी स्कील आले पाहिजे . आय.टी .यायला पाहिजे. बँकिंग क्षेत्रातल्या नोकरी पुढे असतील .इग्लिश कम्युनिकेशन करायला पाहिजे, जी गरज निर्माण होईल त्या प्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण घेतले पाहिजे .३५ मार्क पाडण्याचे दिवस गेले. रयतची नाळ टिकवा .आच असली पाहिजे .आमची रयत शिक्षण संस्था ,महान शिक्षण संस्था आहे.रयतचे कल्चर असेल तर संस्था टिकेल. परदेशी विद्यापीठे येत आहेत. संस्था ,कॉलेजने बदलले पाहिजे . तुमच्याकडील जे बेस्ट असेल ते रयतला द्या असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
मेळाव्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करण्यात आली . प्रा.डॉ. अभिमान निमसे यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी संघातर्फे आणि कॉलेजने आयोजित केलेल्या महत्वाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. डॉ.रामराजे देशमुख यांनी कमवा आणि शिका योजनेचे अहवाल वाचन केले. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजनाचा हेतू सांगून मा. चंद्रकात दळवी यांचा परिचय करून दिला या कार्यक्रमात प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे लिखित’ इकोनोमिकस ऑफ ॲग्रीकल्चर ॲंड डेव्हलपमेंट’ या संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य कॉलेजचे माजी विद्यार्थी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी सुचवले व विद्यापीठाने ते मान्य करून त्यांना अभिनंदन पत्र दिले त्याबद्दल माजी विद्यार्थी संघ व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकात दळवी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या कार्याबद्दल माजी विद्यार्थी संघातर्फे सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी मधुकर शेंबडे यांच्या सुरक्षित वाहतूक मित्र या ग्रंथाची भेट सर्वाना देण्यात आली. ‘या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप किर्दत यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. डॉ.अनिलकुमार वावरे यांनी मानले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी ,प्राध्यापक मोठ्या संख्येने हजर होते.
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com