प्रवीण बजाज यांचेकडून ‘कौशल्य विकास’ केंद्रासाठी संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी
अहमदनगर । दर्शक :
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या 164 व्या जयंती निमित्त दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सच्या अहमदनगर केंद्रातर्फे अभियंता दिन विविध उपक्रम व स्पर्धा, परिसंवादाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मेडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी एक्साइड इंडस्ट्रीजचे चीफ ऑपरेशनस मॅनेजर संदीप मुनोत, पुण्याच्या जे.एस.पी.एम विद्यापीठचे डीन डॉ.राजकुमार देशपांडे व श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सचे नगरचे अध्यक्ष मनोहर अणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उपाध्यक्ष अॅड.अभय राजे यांच्यासह मोठ्या संख्यने इंजिनीअर्स व इंजिनीयरिंग महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अभियांत्रिकी, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अरविंद पारगावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.राजकुमार देशपांडे यांचे यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर प्रमुख व्याख्यान झाले. यावेळी उद्योजक प्रवीण बजाज यांनी संस्थेच्या ‘कौशल्य विकास’ केंद्रासाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली. यावेळी विविध अभियंता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
डॉ. राजकुमार देशपांडे यांनी व्याख्यानात कृत्रिम बुद्धिमत्तेचे औद्योगिक, औषध निर्माण, शस्त्रक्रिया, आरोग्य, वित्त, विपणन या क्षेत्रातील महत्त्व विशद करताना त्याचा मानवी जीवन सुखकर होण्यास कशी मदत होत आहे हे स्पष्ट केले. तसेच नुकत्याच पेजरद्वारे बॉम्ब स्फोट घडवून आणलेल्या घटनेचा उल्लेख करून विध्वंसक कारवायांसाठी आधुनिक सेन्सरचा वापर झाल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून झालेला विकास शास्वत, प्रगतशील व सातत्यपूर्ण असावा असे त्यांनी नमूद केले.
अरविंद पारगावकर यांनी औद्योगिक क्रांतीमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, पर्यावरणावरील ताण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेने दिलेला जीवनगौरव पुरस्कार शक्ती व प्रेरणा वाढवणारा आहे. संस्थेच्या नव्या अभियंता भवनाची इमारत शहराच्या वैभवात भर घालणारी असून येथे नव्या इंजिनिअर्स साठी अभ्यास केंद्र सुरु करावे, यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
प्रमुख अतिथी संदीप मुनोत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा औद्योगीकरणाचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे स्पष्ट केले. पाण्याचा पुनर्वापर, अक्षय ऊर्जा निर्मिती, इलेक्ट्रिक वाहने, या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे विकसात्मक बदल होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष मनोहर अणेकर यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कामाचा आढावा घेतला, तसेच नगर-कल्याण रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या अभियंता भवन या स्वत:च्या इमारतीत संस्थेचे कार्यालय स्थलांतरित झाले आहे. संस्थेला आचार्य चाणक्य कौशल्या विकास केंद्र म्हणून शासनाची मान्यता मिळाली आहे, संस्था लवकरच कौशल्य विकास केन्द्रित कोर्सेस येथे सुरू करत आहे. यासाठी संस्थेच्या सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्यूनिकेशन विभाग प्रमुख प्रा. डॉ.बाळासाहेब आगरकर, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विष्णु आहेर यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार, पुण्याच्या स्ट्रक्टकॉन डिजाइनस कंपनीचे सरव्यस्थापक महेंद्र गोविंद, नगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब कर्डिले, संजीवनी केबीपी तंत्रनिकेतनचे संगणक विभाग प्रमुख डॉ. गणेश जोर्वेकर, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. कृपाल पवार व प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी सहाय्यक प्राध्यापक डॉ. मिलिंद म्हसके यांना अभियांत्रिकी उपलब्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना अभियंता शपथ देण्यात आली. संस्थेचे मानद सचिव अभय राजे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारिणी सदस्य प्रा. दीपक विधाते यांनी आभार मानले. अभियंता भारतभूषण भागवत व प्रा. दादासाहेब करंजुले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकारिणी सभासद व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com