ASI Murder भावाच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून ASI अब्दुल कलाम यांची हत्या 



ASI Murder | अमरावती शहरात २८ जून रोजी सायंकाळी घडलेली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आधी पाठीमागून कारने धडक दिली आणि नंतर तीन जणांनी त्यांना चाकूने छातीवर वार करत भररस्त्यात ठार मारले.

या प्रकरणात ७० हजार रुपयांच्या आर्थिक वादातून हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

मृत अधिकारी कलाम यांचे भाऊ आणि पुतणे यांचा एका महिलेसोबत आर्थिक व्यवहार होता. त्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादात, कलाम यांनी मध्यस्थी केल्याचा राग संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला होता. या संतापातून महिलेच्या मुलाने मित्रांच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

शनिवारी संध्याकाळी अब्दुल कलाम हे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि कारमधून उतरलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार करत हत्या केली.

या प्रकारामुळे अमरावतीत खळबळ उडाली असून, पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तपास सुरू करत तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी जियानउद्दीन (२२), आवेज खान (२२) हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर तिसरा आरोपी फाजील खान (२३) पाय फ्रॅक्चरमुळे रुग्णालयात दाखल असून पोलीस त्यावर नजर ठेवून आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाम यांचे भाऊ आणि पुतणे यांनी एका महिलेकडून ७० हजार रुपये घेतले होते. त्यावरून त्या महिलेला आणि तिच्या मुलाला कलाम यांचा राग होता. पूर्वीही हा वाद थेट पोलीस ठाण्यात गेला होता, पण कारवाई न झाल्याने आरोपींचा संताप वाढला.

त्यानंतर महिलेच्या मुलाने दोन मित्रांच्या मदतीने हत्या करण्याचा कट रचला. या प्रकरणात 302, 34 या कलमांन्वये गुन्हा नोंदवून तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या हत्याकांडाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.