BJP Nagar | गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक परीक्षा बोर्डात साधू-संतांचा सन्मान
नगर : दर्शक ।
भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित गुरूजनांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत नगर येथील मार्केटयार्डजवळील धार्मिक परीक्षा बोर्डात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात कुंदन ऋषीजी महाराज साहेब, अलोक ऋषीजी महाराज साहेब, साध्वी अनुपमाजी महाराज साहेब आदी थोर संत-महाराज यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते, गुरुपौर्णिमा उत्सवाचे जिल्हा संयोजक गोपाल वर्मा, प्रदेश परिषद सदस्य सुनील रामदासी, ज्येष्ठ पदाधिकारी वसंत लोढा, सहसंयोजक बाळासाहेब गायकवाड, भारतभारतीचे अध्यक्ष कमलेश भंडारी, अभय बोरा, श्री बालदोटा यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनिल मोहिते यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगताना सांगितले की, "भारतीय संस्कृतीमध्ये गुरु या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानदान, संस्कार आणि मार्गदर्शन देणारा गुरु हा खऱ्या अर्थाने जीवनाचा शिल्पकार असतो.
आजच्या या पावनदिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात सर्व मठ, मंदिर, शैक्षणिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करून आम्ही संस्कृतीच्या जोपासनेचा संकल्प घेतला आहे. समाजाला दिशा देणाऱ्या गुरुजनांना अभिवादन करताना त्यांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे."
मोहिते पुढे म्हणाले की, "नगर शहरातही आज विविध ठिकाणी आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी विविध संस्था, मंदिर, आश्रम याठिकाणी जाऊन गुरूजनांचा सन्मान करत आहेत. ही फक्त औपचारिकता नसून एक सांस्कृतिक चळवळ आहे जी भारतीय मूल्यांची जपणूक करते."
गुरूपौर्णिमेचा उत्सव साजरा करताना उपस्थित संत-महात्म्यांनीही आपल्या मार्गदर्शनातून धर्म, सेवा, सदाचार आणि अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या उपक्रमाचे कौतुक करत समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपच्या श्री गोपाल वर्मा यांनी केले असून, शेवटी उपस्थित संतांच्या पाद्यपूजनाने व आशीर्वाद ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com