Meherbaba | अवतार मेहेर बाबांचे ’सिक्रेट बुक’ आजही गूढतेतच: मेहेरनाथ कलचुरी
डॉ. मेहेरनाथ कलचुरी हे मेहेरबाबा ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त असून मेहेरबाबांच्या कार्याचा जवळून अभ्यास करणारे एक थोर व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांनी सांगितले की, 13 जुलै 1925 रोजी अवतार मेहेरबाबांनी मौन स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी एका झोपडीत ’सिक्रेट बुक’ लिहिण्यास प्रारंभ केला. या झोपडीतूनच त्यांच्या मौनाचा आणि विश्वकल्याणाच्या कार्याचा नवा अध्याय सुरू झाला.
पुढे ते म्हणाले, या ग्रंथाचे अनेक पाने आजही दुर्बोध आहेत. त्यातील अनेक प्रती नष्टही झाल्या असाव्यात. पण जे काही शिल्लक आहे, त्यातून मेहेरबाबांच्या अंतरात्म्याचा संवाद आपण अनुभवू शकतो.
मेहेरबाबांनी काही काळानंतर ’टेबल हाऊस’ तयार करून घेतले, जिथे त्यांनी लिहिण्यासाठी स्वतंत्र कप्पा बनवला. साडेपाच फूट रूंद आणि साडेसात फूट लांबीच्या या कप्प्यात ते तासन्तास ध्यान आणि लेखन करत असत. 11 ऑक्टोबर 1925 पासून तर ते याच टेबल हाऊसमध्ये झोपू लागले.
हे सिक्रेट बुक म्हणजे कोणत्याही धर्माच्या चौकटीत न बसणारा, पण सर्व धर्मांना एकत्र बांधणारा एक अध्यात्मिक ठेवा आहे, असे डॉ. कलचुरी यांनी नमूद केले. आजही मेहेरबाबांच्या भक्तांमध्ये या ग्रंथाची गूढता आणि अनामिक ओढ कायम आहे.
मेहेरबादमध्ये सध्या हजारो भाविकांनी मेहेरबाबांच्या मौन दिनाच्या निमित्ताने हजेरी लावली आहे. या अध्यात्मिक वातावरणात ‘सिक्रेट बुक’वरील चर्चेने महोत्सवाला एक वेगळीच गूढ रंगत दिली.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com