पोलिसांच्या मुला-मुलींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे; महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने मागणी
नगर – पोलिसांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पोलिस मुख्यालय परिसरातील नव्याने उभारल्या जाणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वसाहतीत हे अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव असोसिएशनने मांडला आहे. या माध्यमातून पोलिसांच्या मुला-मुलींना केवळ पोलीस भरतीपुरतेच मर्यादित न राहता आयपीएस, आयएएससारख्या उच्च पदांपर्यंत मजल मारण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांचे पाठबळ कायम राहणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याबाबत पुढील काळात राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.
या निवेदनावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, खजिनदार संकेत पवार, सचिव सिद्धांत ससाने, गणेश लष्कर, संदीप शिंदे, विनायक भुतकर आदी उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com