जपानी भाषा परीक्षेत विखे अभियांत्रिकीचे 8 विद्यार्थ्यांचे N5 स्तर जपानी भाषा परीक्षेत सुयश
नगर : दर्शक
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, अहमदनगर हे केवळ तांत्रिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असते. या परंपरेत आणखी एक यशस्वी अध्याय जोडला गेला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जपानी भाषेच्या N5 स्तराच्या जपानी भाषा प्राविण्य परीक्षेत उत्तम यश संपादन केले असून, जपान सरकारतर्फे जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
वैष्णवी कदम, अक्षदा तांबे, नेहा शिरसाठ (तृतीय वर्ष माहिती तंत्रज्ञान), विद्या तांबे, तृप्ती जाधव (तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी), सोनाली गुंड, कल्याणी कोल्हे (अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार), कल्याणी दरेकर (पदव्युत्तर नागरी अभियांत्रिकी).
या विद्यार्थ्यांच्या यशामागे महाविद्यालयातील जपानी भाषा उत्कृष्टता केंद्र या विभागाचे मोलाचे योगदान आहे. विशेषतः या केंद्राच्या संचालिका सौ. पूजा वैकर यांनी विद्यार्थ्यांना दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तसेच प्रा. सौ. वैदेही पारनाईक मॅडम यांनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे विद्यार्थी जपानी भाषेत पारंगत झाले. जपानी भाषेतील लेखन, वाचन व संभाषण या तिन्ही अंगांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठा फायदा झाला.
या यशामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षण, संशोधन तसेच आंतरराष्ट्रीय रोजगार संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. विशेषतः जपानमधील औद्योगिक क्षेत्रात करिअर घडविण्याच्या दृष्टीने ही भाषा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विखे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक उंचीमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, महाविद्यालयाच्या "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्न" या ध्येयवाक्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ.रविंद्र नवथर, विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे टेक्निकल डायरेक्टर प्रा.श्री. सुनिल कल्हापुरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच फौंडेशनचे डायरेक्टर जनरल डॉ.पी.एम. गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com