Top News

घरातूनच स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात झाली तरच सशक्त समाज घडेल – डॉ. प्रीती भोंबे

 समर्थ विद्या प्रसारक मंडळात ‘समर्थ महिला दिन’ उत्साहात

घरातूनच स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात झाली तरच सशक्त समाज घडेल – डॉ. प्रीती भोंबे








नगर : दर्शक । 
 समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने सांगळे गल्ली येथील श्री समर्थ विद्यामंदिरात ‘समर्थ महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास स्नेहालयाच्या मानस सचिव डॉ. प्रीती भोंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.





         कार्यक्रमाच्या प्रारंभी परिसरातील अंगणवाडी सेविका, सांगळे गल्लीतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षिका तसेच शाळेतील माता-पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, संचालक स्वप्निल कुलकर्णी, संचालक सुनील जोशी, मुख्याध्यापक अजय महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




        यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. प्रीती भोंबे यांनी प्रथम संस्थेचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, महिलांनी प्रत्येक वेळेस ‘सुपर वुमन’ होण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. आयुष्यातील संघर्ष एकट्याने करण्याऐवजी कुटुंबीयांची साथ घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. महिला सक्षम होण्यासाठी कुटुंब, समाज आणि संस्थांची साथ मिळणे आवश्यक असून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.





        पुढे त्या म्हणाल्या की, यावर्षीच्या महिला दिनाची ‘गिव्ह अँड गेन’ ही संकल्पना समाजासाठी मार्गदर्शक आहे. घरातूनच स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात झाली पाहिजे. महिलांचा सन्मान आणि त्यांना समान संधी दिल्यास समाज अधिक सशक्त बनेल. महिला दिन साजरा करताना केवळ महिलांनी नव्हे तर पुरुषांनीही सहभागी होणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजाने मनापासून स्वीकारला तरच प्रगतीशील आणि सुदृढ समाजव्यवस्था उभी राहू शकते, असेही त्यांनी सांगितले.





        शिशुविहार शाळेच्या सुनीता देव यांनी संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे माध्यमिक विभाग शाळा समितीचे चेअरमन स्वप्निल कुलकर्णी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार केला.




          अध्यक्षीय समारोपात श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की, आजच्या युगात संस्कृती आणि विज्ञान यांचा संगम साधणाऱ्या ‘नवदुर्गा’सारख्या सक्षम महिलांची समाजाला गरज आहे. महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक विचार रुजवण्यासाठी संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.




           प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील कानडे यांनी केले. त्यांनी शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शारदा होशिंग, हेमलता शिंदे, जयश्री काळे आणि ज्योती मानकर या शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले.




      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप गायकवाड आणि किशोर महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन रंगनाथ देशमुख यांनी मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم