Dr Vikhe Patil College |  डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीतरिदम 2K26 पारितोषिक वितरण संपन्न

Dr Vikhe Patil College | सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्तीच यशाची गुरुकिल्ली – अमित रत्नपारखी







Dr Vikhe Patil College | नगर - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित ‘रिदम 2K26’ या वार्षिक कार्यक्रमातील पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.





         या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट श्री. वसंतराव कापरे उपस्थित होते, तर मुख्य अतिथी म्हणून श्री.अमित रत्नपारखी (मेकॅनिकल, बॅच 1994) यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.





श्री.अमित रत्नपारखी सध्या स्टरलाइट टेक्नॉलॉजिस लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे ग्लोबल प्रोक्योरमेंट हेड म्हणून कार्यरत असून त्यांना 30 वर्षांहून अधिक औद्योगिक अनुभव आहे. त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.





          आपल्या भाषणात श्री. अमित रत्नपारखी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “यश मिळवण्यासाठी सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करून नवकल्पना करण्यावर भर द्यावा.” त्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी कौशल्यविकास तांत्रिक ज्ञान आणि संवाद कौशल्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.


          तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना अपयशाला घाबरू नका, तर त्यातून शिकून पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली.


         कार्यक्रमास मान्यवर पाहुणे म्हणून श्री. प्रवीण म्हस्के आणि श्री. संदीप चंगेडे यांची उपस्थिती लाभली. श्री. प्रवीण म्हस्के (बॅच 2001) हे Infosys मध्ये प्रिन्सिपल डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत असून त्यांना 24 वर्षांचा अनुभव आहे. ते डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. श्री.संदीप चंगेडे (बॅच 1993) हे सिस्कॉन कॅम्पुटर सिस्टीम, पुणे यांच्याशी संलग्न यशस्वी उद्योजक आहेत.


        या प्रसंगी डॉ. पी.एम. गायकवाड, सेक्रेटरी जनरल विखे पाटील फाउंडेशन चे प्रा.सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ.आर.आर. नवथर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


       यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यात अकॅडमिक प्राइजेस, स्पोर्ट्स प्राइजेस,आर्ट एक्झिबिशन, पद्मश्री करंडक इत्यादींचा समावेश होता. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. सुनील मांढरे तसेच या कार्यक्रमासाठी डॉ.संदीप उदावंत, प्रा. पंकज औताडे, डॉ.कानिफ मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे डायरेक्टर जनरल प्रशासन डॉ.पी.एम. गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, तसेच संस्थेचे चेअरमन व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले. हा पारितोषिक वितरण सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला.