अहमदनगरमधील मान्यवरांच्या हस्ते जायभाय, पत्रे, मकर, खरपुडे यांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी) - दक्षिण आफ्रिकेत जाऊन जागतिक दर्जाची कॉम्रेड मॅरेथॉन पुर्ण तर केलीच शिवाय दुसर्या वर्षी स्पर्धेत सहभाग नोंदवून नगरच्या धावपटूंनी पदके मिळविली. परदेशात नगरचे नाव उंचावले ही आमच्या अहमदनगर सायकलिंग क्लब व नगरकरांच्या दृष्टीने भुषणावह बाब आहे. नगरमध्येही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते आपल्या मेहनतीने देशासाठी मेडल मिळवू शकतात हे या खेळाडूंनी दाखवून दिले आहे.
जागतिक दर्जाच्या स्पर्धांसाठी तयारी करणे हे फार कठिण काम आहे, त्यात पात्र होणे आणि त्यानंतर सहभागी होऊन यश मिळविणे ही सोपी गोष्ट नाही. दक्षिण आफ्रिकेतील वातावरणाशी जुळवून घेत बॅक टू बॅक मेडल मिळविणारे हे खेळाडू खरे आयडॉल आहेत, असे प्रतिपादन अहमदनगर सायकलिंग क्लबचे अध्यक्ष गौरव फिरोदिया यांनी केले.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पदक मिळविलेल्या योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय, रवी पात्रे यांचा अहमदनगर सायकलिंग क्लबच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष गौरव फिरोदिया, ब्रिगेडियर रसेल डिसोझा, कर्नल नटराजन, कर्नल जे.एस.धुल, पोलिस अधिक्षक राकेश ओला, अतिरिक्त पो.अधिक्षक प्रशांत खैरे, डॉ.अभिजित पाठक, माजी महापौर अभिषेक कळमकर, क्लबचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी यशस्वी धावपटूंचे अभिनंदन करुन, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देतांना या यशस्वी धावपटूंनी क्लबच्या सदस्यांचे प्रोत्साहन आणि नगरकरांच्या शुभेच्छा यामुळे आम्हाला यश मिळाले. यापुढेही अशीच कामगीर आमच्याकडून होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार मेहेरप्रकाश तिवारी यांनी मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com