गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीमान योगी प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी) - जीवनात गुरुला फार महत्व आहे. आपला शिष्य सत्मार्गावर चालावा, त्यांच्या जीवनात उन्नत्ती व्हावी, त्याच्या हातून समाजाची सेवा व्हावी, यासाठी गुरु नेहमीच आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतात. सलाम सर यांनी नेहमीच चांगले कार्य करण्यास प्रेरणा दिली आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञान आणि प्रत्येकाप्रती असलेला प्रेमळभाव सर्वांना आपलेसे करतात.
शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य कुटूंबातील मुला-मुलींना आधुनिक व दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले आहे. त्याचबरोबर सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राही बहुमोल योगदान देत आहेत. श्रीमान योगी प्रतिष्ठानच्यावतीने गुरुजणांचा सन्मान करुन त्यांचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीमान योगी प्रतिष्ठानच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुजणांना सन्मान करण्यात आला. यावेळी मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खा.निलेश लंके, माजी आ.दादाभाऊ कळमकर, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, आयोजक माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ.संजय कळमकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अभिषेक कळमकर म्हणाले, आपल्याला चांगला मार्ग दाखवून जीवनाचा उद्धार करण्याचे काम गुरु करतात. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा दिवस होय. स्वत:च्या अस्तित्वाची आणि सामर्थ्यांची जाणिव करुन देण्याचे काम गुरु करत असतात. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे जीवनात अनेक आमुलाग्र बदल होऊन दिशा मिळत असते. या गुरुजणांना सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजत असल्याचे सांगितले.
सत्कारास उत्तर देतांना सलाम सर म्हणाले, गुरु आणि शिष्य यांचे अतुट नाते असते. आपला शिष्य हा आपल्यापेक्षा मोठा व्हावा, ही गुरुंची इच्छा असते आणि तो त्या पदापर्यंत पोहचल्याचे समाधान आणि अभिमान गुरुला होतो. आज गुरुजणांचा सन्मान करुन श्रीमान योगी प्रतिष्ठानने जी कृतज्ञता व्यक्त केली, ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे. या सन्मानामुळे आमच्यातील जबाबदारी जाणिव व प्रचितीही होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर, दादाभाऊ कळमकर यांनीही मनोगतातून गुरुजणांबद्दल आदर व्यक्त केला. या सन्मानाबद्दल सलाम सर यांचे अनेकांनी अभिनंदन करुन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com