China Manja | नगरमध्ये युवकांची तत्परता – बगळा पक्ष्याचे प्राण वाचवले
China Manja | नगर – नगर येथील अमरधाम परिसरात तीन तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे एका बगळा पक्ष्याचा जीव वाचला. अंत्यविधीसाठी आलेल्या बंटी दडगे यांच्या लक्षात आले की, एक बगळा पक्षी चायना मांजामध्ये अडकून झाडाच्या फांदीला लटकत होता. त्या पक्ष्याची हालचालही बंद झाली होती आणि तो जीवघेण्या अवस्थेत होता.
चायना मांजा हा नायलॉनपासून बनवलेला असून, अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असतो. त्यामुळे एकदा त्यात अडकलेल्या पक्ष्याला सहजासहजी सुटका मिळत नाही. बंटी दडगे यांनी त्वरित योगेश न्यालपेल्ली आणि शुभम सुंकी यांना माहिती दिली आणि तिघांनी मिळून त्या पक्ष्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सुरुवातीस झाडावर चढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र फांद्या नाजूक असल्यामुळे त्या तुटत होत्या. अखेर अमरधाममध्ये असलेल्या एका मोठ्या शिडीचा वापर करून ते झाडाजवळ पोहोचले. मोठ्या बांबूच्या सहाय्याने चायना मांज्याला हळूवारपणे खेचत त्यांनी बगळ्याला हातात घेतले आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या गुंतवळीतून त्याची सुटका केली.
नुसती सुटका करून थांबले नाहीत, तर त्या पक्ष्याला पाणी आणि थोडेसे अन्न देऊन त्याचे हाल झालेले शरीर सावरण्यास मदत केली. त्यानंतर त्याला परत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक भान असलेल्या कृत्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
या घटनेमुळे चायना मांजाच्या वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेक पक्ष्यांचे जीव घेतलेला हा धोकादायक मांजा त्वरित बंद करण्याची मागणीही नागरिक करत आहेत.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com