Sangamner | महाराष्ट्र शासन युवा धोरण उच्च स्तरीय समिती गठीत ; अध्यक्षपदी मंत्री भरणे तर आमदार तांबे सदस्यपदी
संगमनेर । दर्शक । :-
महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवकांसाठी नव्या पिढीच्या गरजांनुसार समकालीन आणि प्रभावी युवा धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, तर आमदार सत्यजीत तांबे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या २१ सदस्यीय समितीत विधिमंडळाचे सदस्य, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय आणि राज्य युवा पुरस्कार प्राप्त प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
आ. सत्यजीत तांबे हे सभागृहातील तरुण व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. युवकांच्या प्रश्नांवर त्यांची सुस्पष्ट भूमिका असून, त्यांनी अनेकदा विधानमंडळात युवकांचे मुद्दे प्रभावीपणे मांडले आहेत. २०१२ मध्ये तयार करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य युवा धोरण आजच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक व तांत्रिक परिस्थितीत कालबाह्य झाले आहे, असे शासनाचे मत आहे. त्यामुळे या जुन्या धोरणाचा सविस्तर आढावा घेऊन नव्या धोरणाची रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या नव्या धोरणात युवकांसाठी शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेतृत्व विकास आदी बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
या समितीचा कार्यकाल तीन महिन्यांचा असून, या कालावधीत ती राज्यातील विद्यमान धोरणाचा अभ्यास करून, सुधारित धोरणासंदर्भात शासनाला शिफारशी करणार आहे. नव्या धोरणासाठी लागणाऱ्या योजनांची आखणी, त्यासाठीचा वित्तीय आराखडा आणि केंद्र शासनाच्या धोरणांशी सुसंगती यांचाही समावेश या अभ्यासात असेल. राज्यातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असून, आमदार सत्यजीत तांबे यांचे अनुभव आणि कार्यपद्धती या प्रक्रियेला निश्चितच परिणामकारक ठरवतील, असा विश्वास राज्यातील युवकांमध्ये व्यक्त होत आहे.
युवा शक्तीला दिशा देणारे धोरण
राज्याच्या युवकांसाठी प्रभावी व वास्तववादी धोरण तयार करणे ही एक मोठी जबाबदारी असून, मी ती मनापासून पार पाडणार आहे. आजचा युवक केवळ पारंपरिक शिक्षणापुरता मर्यादित नाही. तो स्टार्टअप्स, तंत्रज्ञान, कला, पर्यावरण, समाजसेवा, क्रीडा यांसारख्या अनेक क्षेत्रांत झेप घेत आहे. अशा युवा शक्तीला दिशा देणारे धोरण तयार करणे हे काळाची गरज आहे.
– आ. सत्यजीत तांबे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com