Bhingar | खासदार निलेश लंके यांच्या आदेशाने नागरदेवळे परिसरात नालेसफाईला सुरुवात

Bhingar | खासदार निलेश लंके यांच्या आदेशाने नागरदेवळे परिसरात नालेसफाईला सुरुवात








भिंगार  – पावसाळा सुरू होऊनही नागरदेवळे भागात नालेसफाई न झाल्याने निर्माण झालेल्या  धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर  खा. निलेश लंके यांच्या आदेशानुसार येथील ग्रामपंचायतीमार्फत नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे.






दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या भागात नालेसफाई केली जात होती. मात्र यंदा पावसाळा सुरू होऊन १० दिवस उलटले तरी नालेसफाई झालेली नव्हती. परिणामी, नागरिकांच्या घरगुती ड्रेनेजचे पाणी नाल्यातून वाहून जात नव्हते. त्यातच या नाल्यात विषारी प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्रीच्या वेळेस हे प्राणी खुलेआम फिरताना दिसत असल्याने लहान मुले, महिलांना विशेष धोका निर्माण झाला होता.





या समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधत सागर चाबुकस्वार यांनी नुकतीच पारनेर तालुक्यातील हंगा गावात खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर लंके यांनी तत्काळ ग्रामविकास अधिकारी मा.नांगरे यांच्याशी संपर्क साधून तातडीने नालेसफाई करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतीनेही त्वरित हालचाल करत नालेसफाईचे काम हाती घेतले असून सध्या हे काम सुरू आहे.




या कामाबद्दल नागरदेवळे भागातील नागरिकांनी खासदार निलेश लंके, ग्रामविकास अधिकारी नांगरे आणि काँग्रेस अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.