Shikshak Bharti Nagar | अकोले येथे शिक्षक भारतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
Shikshak Bharti Nagar | नगर : दर्शक ।
शासनाच्या उदासीन धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रासमोरील समस्यांची मालिका अधिकच गंभीर होत असून, विरोधी पक्ष देखील शिक्षकांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला. अकोले येथे पार पडलेल्या शिक्षक भारतीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत सुभाष मोरे यांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा ठळकपणे मांडला. "इतर विभागांतील २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असताना, शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील शिक्षकांना याच योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे, हे दुर्दैवी आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "संच मान्यता अद्याप मागे घेण्यात आलेली नाही, टप्पा अनुदान प्रलंबित आहे, डी.सी.पी.एस., एन.पी.एस. अशा विविध पेन्शन योजनांमुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिरिक्त शिक्षकांचा पगार बंद करण्यात आला असून, ६ हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षाचे थकीत वेतन, सी.एच.बी., अर्धवेळ मान्यता, यांसह अनेक प्रलंबित प्रश्न अद्याप शासनदरबारी प्रलंबित आहेत."
या सगळ्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. "आगामी काळात शिक्षकांनी संघटित होऊन एकसंघपणे लढा दिला नाही, तर अधिक संकटांना तोंड द्यावे लागेल," असा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीस पुणे विभागाचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर, जिल्हा संघटक चंद्रशेखर हासे, माध्यमिक विभागाचे कोषाध्यक्ष सोमनाथ बोनंतले, तालुकाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष गणपत धुमाळ, दत्तात्रय घुले, प्रवीण मालुंजकर, विजय पांडे, बळीराम फरगडे, वाघमारे, संतोष वाकचौरे, संदीप महाडदेव, विकास आवारी, सुरेश वाकचौरे, आनंद चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com