Rotary Club |  रोटरी ही संस्था केवळ एक संघटना नसून समाजाला दिशा देणारी चळवळ - क्षितिज झावरे


Rotary Club | रोटरी क्लब अहमदनगरचा पदग्रहण सोहळा उत्साहात


     अहमदनगर (प्रतिनिधी) - रोटरी ही संस्था केवळ एक संघटना नसून समाजाला दिशा देणारी चळवळ आहे. अहमदनगर रोटरी क्लबने आतापर्यंत राबवलेल्या प्रकल्पांमुळे गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचला आहे. येणार्‍या काळातही नव्या उत्साहाने समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन रोटरीचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा आहे,असे प्रतिपादन प्रांतपाल क्षितिज झावरे यांनी केले.



     अहमदनगर रोटरी क्लबचा भव्य पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला रोटरी इंटरनॅशनलचे 2027-28 चे प्रांतपाल रोटरियन क्षितिज झावरे व सहाय्यक प्रांतपाल रोटरियन मधुरा झावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी क्लबचे नूतन अध्यक्ष सुभाष गर्जे व सचिव संदीप ठोंबे यांनी आपली पदे स्वीकारली. 




माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, शिरीष रायते यांच्यासह महावीर मेहेर, निलेश वैकर, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, पुरुषोत्तम जाधव, दादासाहेब करंजुले, सर्जेराव निमसे, गुलशन गुप्ता, नितीन थाडे, सुरेश कांकरिया, दिलीप कर्णावट, सुनिता कर्णावट, प्रशांत बोगावत, कौशिक कोठारी, रवींद्र राऊत, अनघा राऊत, माधवराव देशमुख, साधना देशमुख, हर्षवर्धन सोनवणे, प्रीती सोनवणे, दीपक गुजराती, राजीव गुप्ता, राजेंद्र उपाध्याय, सुहास क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.



     प्रांतपाल झावरे पुढे म्हणाले, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या कौशल्यविकासासाठी रोटरीने ठोस योजना राबवायला हव्यात. सामाजिक बदल घडवण्यासाठी सेवा कार्यात सातत्य हाच आपला मंत्र असावा. अहमदनगर क्लबचे कार्य हे प्रांतातील इतर क्लबांसाठी आदर्श ठरेल, असा मला विश्‍वास आहे.



     यावेळी सुभाष गर्जे यांनी नूतन अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारत आपल्या भाषणात भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले, रोटरीची परंपरा म्हणजे निःस्वार्थ सेवा. या क्लबच्या अध्यक्षपदावर निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.



 समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना सहाय्य करण्यासाठी आम्ही नवीन प्रकल्प आखणार आहोत. सदस्यांच्या एकजुटीने रोटरी क्लब अहमदनगरला नवीन उंचीवर नेण्याचा माझा संकल्प आहे. लवकरच शहर व ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, शिक्षणविषयक कार्यक्रम आणि वृक्षारोपण मोहीमा राबवू. रोटरी क्लबच्या सेवाभावातून शहराच्या विकासात मोलाचे योगदान देऊ, असा माझा विश्‍वास आहे.



     कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश वंदना अनन्या वैकर हिने सादर केले. तसेच प्रमुख पाहुण्याच्या हस्ते तुळसीच्या रोपास पाणी देवुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.



     या पदग्रहण सोहळ्यात सर्व नूतन पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारून समाजसेवेची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब करंजुले व सौ.भावना वैकर यांनी केले तर आभार नुतन सेक्रेटरी संदीप ठोंबे यांनी मानले.