३५ वर्षांच्या निःस्वार्थ सेवेचा राष्ट्रीय स्तरावर झाला गौरव

Samajik Puraskar | चंद्रकांत काळोखे छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान


 नगर : दर्शक ।


      
      जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी हे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे ब्रीद घेऊन तीन दशकांहून अधिक काळ समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झगडणारे आणि सामाजिक कार्याला जीवनधर्म मानणारे चंद्रकांत काळोखे यांना यंदाचा राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२' ने सन्मानित करण्यात आले आहे.

 






           विवेक विचार मंचातर्फे भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक न्याय,समताधिष्ठित बंधूभावपूर्ण समाज निर्मितीसाठी काम करणाऱ्यास या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.हा पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर येथे एका भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, बार्टीचे संचालक सुनिल वारे,जेष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, डॉ.माधवी खोडे-चवरे, डॉ.सुभाष कोंडावार उपस्थित होते.  








             चंद्रकांत काळोखे हे मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.भावीज्ञानी ग्रामीण युवा कला क्रीडा संकुल कर्जत व भानुविश्व ज्ञानयोगी निकेतन संस्थांचे अध्यक्ष असून गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटन संस्थेचे संस्थापक आहेत.त्यांनी समाजकार्यास प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणतांबा शाखेतून केला.पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले.त्यांचे शिक्षण बीएससी, बीए(इंग्रजी), बीपीएड, एमपीएड झाले असून, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कर्जत ग्रामपंचायतीत सदस्य म्हणूनही काम केले.नंतर जिल्हा परिषदेत नोकरी मिळूनही त्यांनी सामाजिक समर्पणासाठी ती सोडली. 






         ग्रामीण भागात त्यांनी पोतराजकी बंद करणे,वीटभट्टी कामगारांची मुले शाळेत दाखल करणे,त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळवून देणे, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, उद्योजकता तसेच व्यसनमुक्ती व दारुबंदी अशा विविध उपक्रमांद्वारे मोठे कार्य केले. ते स्वतः राज्यस्तरीय खेळाडू व राष्ट्रीय पंच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या नऊ राष्ट्रीय खेळाडूंपैकी सात खेळाडू सरकारी सेवेत कार्यरत आहेत. 






          स्टँड अप इंडिया योजनेतून अनुसूचित जातीतील चार महिला, एक गतिमंद युवक आणि एक उच्चशिक्षित युवक यांना प्रत्येकी ४८ लाख रुपयांचे कर्ज व अनुदान मिळवून दिले.तर रस्त्यावर झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातातील जखमींना मदत केलीय तर अपघातग्रस्त मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केलेत.सामाजिक समतेसाठी त्यांनी संविधान जागर यात्रा २०२४ पुस्तिका प्रसारित करून संविधानाबाबत जनजागृती केली. शेकडो चारित्र्यसंपन्न कार्यकर्ते व युवक घडविण्याचे कार्य हेच त्यांच्या कार्याचे सर्वोच्च यश आहे.






          या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या समता, बंधुता, एकात्मता, सामाजिक न्याय मिळवून देणे अशा योगदानाची दखल घेऊन त्यांना 'सामाजिक न्याय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे