Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ अंतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम

 Ahmednagar College |
करिअर कट्टा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधीचा ‘समृद्धी महामार्ग’ - यशवंत शितोळे







नगर : दर्शक । 

 विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनापुरता न करता तो शिक्षण, संवाद आणि करिअर उभारणीसाठी साधन म्हणून केला, तर करिअरच्या संधी आपोआप वाढतील,” असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष  यशवंत शितोळे यांनी केले.




       भा.पा. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. शितोळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.






      शितोळे पुढे म्हणाले, आजचे विद्यार्थी मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी करतात. मात्र, मोबाईल वापरण्याची संस्कारशील आचारसंहिता अंगीकारणे गरजेचे आहे. गुगल मिट, झूम, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम यांसारख्या साधनांचा सुसंस्कृत संवादासाठी वापर करावा. ट्रोलिंग, अपशब्द, धमक्या व अपमानास्पद भाषा टाळावी. 



मोबाईलचा वापर ग्राहक म्हणून न करता जागरूक वापरकर्ता म्हणून करणे आवश्यक आहे. करिअर कट्टा या उपक्रमातून आतापर्यंत तब्बल २५०० विद्यार्थी स्पर्धा परीक्षांद्वारे यशस्वी होऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजकही झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरण्याची पद्धत बदलली, तर करिअरची संधी आपोआप निर्माण होईल आणि ‘करिअर कट्टा’ हा विद्यार्थ्यांसाठी करिअरचा ‘समृद्धी महामार्ग’ ठरेल.



      कार्यक्रमानंतर श्री. शितोळे यांनी जिल्हा करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन केले. या प्रसंगी सारडा महाविद्यालय नगर, दादा पाटील राजळे महाविद्यालय अदिनाथ नगर आणि अहमदनगर महाविद्यालय येथील करिअर संसद पदाधिकारी उपस्थित होते.



      कार्यक्रमाला प्राचार्य प्रवर्तक डॉ. राजधर टेमकर (दादा पाटील राजळे महाविद्यालय, अदिनाथ नगर), छत्रपती महाविद्यालय श्रीगोंदा यांचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, सारडा महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. प्रसाद तांबे, डॉ. विलास सुद्रिक आदी मान्यवर उपस्थित होते.


      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक (दक्षिण) प्रा. डॉ. भागवत परकाळ यांनी केले. सूत्रसंचालन शिवानी मुठे हिने केले, तर आभार प्रदर्शन नम्रता सिंग यांनी मानले.



        श्रद्धा गायकवाड, हर्षिता रवारीया, रोहित मुथा, शेख शफक, खान शीफा आणि अर्जुन गहिले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, डॉ. सय्यद रज्जाक, डॉ. प्रितमकुमार बेदरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रतुल कसोटे, प्राध्यापकवर्ग आणि श्रीमती काल्पलता भिंगारदिवे यांचे विशेष सहकार्य लाभले.