Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि बिझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे वेलकम फंक्शन  (फ्रेशर्स पार्टी) उत्साहात साजरा





  नगर : दर्शक । 

 प्रत्येक विद्यार्थी कॉलेज जीवनातील आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे फ्रेशर्स पार्टी. अहमदनगर महाविद्यालयातर्फे नुकतीच फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले.


     या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कॉलेजच्या अकाउंट्स रजिस्टर श्रीमती भिंगारदिवे होत्या. कार्यक्रमाचे स्वागत भाषण विभागप्रमुख तूषिता अय्यर यांनी केले.



     प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी जीवन हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हा काळ केवळ शैक्षणिक अभ्यासापुरता मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची संधी आहे. 



आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे ठरत नाही, तर संवादकौशल्य, नेतृत्वगुण, शिस्त, टीमवर्क आणि प्रामाणिकपणा यांचा संगम साधणे तितकेच आवश्यक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्‍वास, सातत्य आणि कठोर परिश्रम हीच खरी शिदोरी आहे.




     ते पुढे म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात करिअर निवडा, पण त्यामध्ये उत्कृष्टता मिळवण्याचे ध्येय ठेवा. फक्त नोकरी मिळवणे एवढेच आपले ध्येय असू नये, तर समाजासाठी उपयोगी ठरणारा, जबाबदार आणि सजग नागरिक म्हणून आपले स्थान निर्माण करणे गरजेचे आहे. महाविद्यालय हे केवळ ज्ञान देणारे केंद्र नाही, तर चारित्र्य आणि मूल्ये घडवणारे व्यासपीठ आहे. या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या.



      भिंगारदिवे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.वाय. चे विद्यार्थी सृष्टी तनवर व आदित्य लगड यांनी केले तर आभार प्रदर्शन साहिल हजारी यांनी केले. कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन सादर केले.



     एफ.वाय. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये - मिस्टर फ्रेशर - शिवतेज गंडाळ,मिस फ्रेशर - स्तुती क्षत्रिय, बेस्ट पर्सनॅलिटी - अमीर शेख, बेस्ट टॅलेंट - मिताली भिंगारदिवे, कॉन्फिडंट पर्सनॅलिटी - विनायक पंडित, यांनी पारितोषिके पटकावली. या स्पर्धेच्या परीक्षक प्रा. शितल कुलकर्णी व प्रा. गीता वर्मा होत्या.



     या कार्यक्रमाला बीबीए विभागातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या आयोजनाला त्यांचे मार्गदर्शन लाभले.