डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व फ्रान्स येथील पॅरीस स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड बिझनेस यांच्यात सामंजस्य करार
Dr Vikhe Patil College | नगर : दर्शक ।
विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, अ.नगर हे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व, तांत्रिक कौशल्य व संशोधन वृत्ती वाढविण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवत असते. या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय आयाम लाभावा यासाठी महाविद्यालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून नुकताच पॅरीस स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड बिझनेस, फ्रान्स यांच्यासोबत सामंजस्य करार (चेण) करण्यात आला.
या करारानुसार शैक्षणिक सहकार्यास प्रोत्साहन, संशोधनातील सहकार्य, शैक्षणिक संसाधनांची देवाणघेवाण, फॅकल्टी व स्टुडंट एक्सचेंज, तसेच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना चालना देणे यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संधी मिळतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या करार प्रसंगी पॅरीस स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड बिझनेसचे भारतातील प्रतिनिधी श्री. मिहीर क्षीरसागर उपस्थित होते. तसेच मेडिकल संचालक डॉ. अभिजीत दिवटे, डॉ.विखे पाटील फाऊंडेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम. गायकवाड, डायरेक्टर टेक्निकल प्रा.सुनिल कल्हापुरे डॉ. आर.एस. पडळकर, श्री. शशांक सुवर्णपत्की व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र नवथर आदी मान्यवरही उपस्थित होते.
यावेळी पॅरीस स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड बिझनेसचे भारतातील प्रतिनिधी श्री. मिहिर क्षीरसागर म्हणाले की, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेला हा केवळ करार नसून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व तंत्रज्ञानाशी थेट जोडणारा पूल आहे, आमच्या संस्थेला भारतातील तरुणाईची ऊर्जा व नाविन्यपूर्ण विचारसरणी यावर विश्वास आहे. हा करार दोन्ही संस्थांच्या ज्ञान आणि संशोधन क्षमतेत नवी उंची गाठेल .
यावेळी प्रा. सुनिल कल्हापुरे म्हणाले की, फाऊंडेशनच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य दिले आहे. आता आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांशी केलेले हे सहकार्य विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधींच्या दृष्टीने ‘गेम चेंजर’ ठरेल, विद्यार्थ्यांना फक्त पदवी मिळवणे हा उद्देश राहू नये, तर ते नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे निर्माते व्हावेत, यासाठी करार अंतर्गत येणारे विविध उपक्रम - एक्स्चेंज प्रोग्राम्स, संशोधन प्रकल्प आणि जागतिक दर्जाच्या वर्कशॉप्स - फार महत्त्वाचे ठरणार आहेत.
या करारामुळे विखे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परदेशी तज्ज्ञांकडून शिकण्याची संधी, आंतरराष्ट्रीय संशोधनात नवी दिशा मिळणार आहे. हा करार विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शक्यतांना नवे क्षितिज उघडून देणारा ठरेल, अशी सर्वांनी आशा व्यक्त केली.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील आणि संस्थेचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कराराचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही सुवर्ण संधी असल्याचे मत व्यक्त केले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com