Snehalay | स्नेहालय संस्थेमुळे सामाजिक स्वास्थ्याची पायाभरणी : ना. राम शिंदे





नगर : दर्शक । 

देशाचे पायाभूत प्रश्न आजही सामाजिक स्वरूपाचे आहेत.  जटील सामाजिक प्रश्नांवर  स्नेहालयाने  विविध  सामाजिक प्रकल्प  सुरू केल्याने समाजस्वास्थ्याची पायाभरणी झाल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे यांनी केले.


विविध कारणांनी परावलंबित्व आलेल्या रुग्णांसाठी दर्जेदार निवासी सेवा आणि सुश्रुषा देणाऱ्या स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र उपक्रमाच्या तिसऱ्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण ना. शिंदे यांच्या हस्ते काल झाले. अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते. पद्मभूषण अण्णा हजारे यांचीही ऑनलाईन उपस्थिती होती.


यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आधार आपुलकी फाउंडेशनचे संस्थापक हेमंत लोहगावकर, यवतमाळ येथील मोहनलाल शांताबाई राठी चारिटेबल फाउंडेशनचे संस्थापक सुरेश राठी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. केडगाव येथील  मॅकडोनाल्ड पाठीमागे  स्नेहदीप केंद्राची तिसरी सुसज्ज वास्तू बांधण्यात आली. 


वृद्धत्व, कॅन्सर, विस्मृती, अपघात, अर्धांगवायू , शस्त्रक्रियेनंतर आवश्यक सुश्रुषा इत्यादी कारणांनी परावलंबित्व आलेल्या रुग्णांसाठी येथे दर्जेदार निवासी उपचार उपलब्ध झाले आहेत. स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र  मागील 6 वर्षांपासून स्नेहालय संस्था चालविते. या प्रकल्पामुळे आजवर सुमारे 200  रुग्णांना आधार मिळाला. या प्रकल्पातील 30 टक्के जागा अत्याचारीत आणि एकाकी महिलांसाठी राखीव आहेत. इतरांना परवडणाऱ्या शुल्कात सेवा दिल्या जातात.

दात्यांचा सन्मान

स्नेहदीप संकुलाच्या एका मजल्यास महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते दांपत्य स्वर्गीय आशाताई आणि देवचंद मथुरदास शेठ यांचे नाव देण्यात आले . त्यांच्या कुटुंबातील लायन चंद्रशेखर शेठ आणि सौ.शैला शेठ, सौ. वंदना संजीव शेठ, सौ. शोभा अरुण मेहता, श्री. सतीश मेहता, डॉ. प्रकाश शहा  यांचा यावेळी गौरव करण्यात आला.  बांधकामात सहयोग देणाऱ्या ठाणे येथील एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे  संस्थापक अध्यक्ष  अरुण रामचंद्र शेठ आणि सौ. मृणालिनी अरुण शेठ यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

स्नेहदीप सारख्या प्रकल्पांची देशाला गरज 

प्रास्ताविकात स्नेहालयाच्या सचिव डॉ. प्रीती भोम्बे यांनी नमूद केले की,भारतात विविध कारणांनी परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांची संख्या 12 कोटी हून अधिक आहे. भविष्यात वृद्धांची संख्या आणि समस्या भारतात वाढणार आहे. अशावेळी वृद्धाश्रम हॉस्पिटल आणि घर यांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या स्नेहदीप सारख्या प्रकल्पांची देशाला गरज आहे.


स्नेहालयाच्या खजिनदार गीता कौर यांनी सांगितले की, " सेवा सुश्रुषा क्षेत्रात असणारी रोजगार संधी लक्षात घेऊन यंदाच्या वर्षीपासून स्नेहालय रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रम सुरू केला.  अल्प शिक्षण झालेल्या परंतु सेवेची आवड असलेल्या तरुण मुला-मुलींना 3 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देऊन हक्काचा रोजगार याद्वारे उपलब्ध करून दिला जातो. स्नेहदीप प्रकल्पात या प्रशिक्षणार्थींना अनुभव दिला जातो.स्नेहदीप उपक्रमाच्या वास्तूतच रुग्णसहाय्यक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. "      


 या प्रशिक्षणात प्रथम  आलेल्या आयशा आणि बुशरा शाहिद पठाण तसेच पौर्णिमा मोहन कांबळे यांनाही यावेळी गौरविण्यात आले.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरी वादक अनिल आरसूळ यांनी यावेळी वादन सादर केले.सौ.स्वाती रानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.