Nabi-E-Rehmat | वर्क फोर कंम्पॅशनचे राष्ट्रीय स्तरावर "नबी ए रहमत" स्पर्धेत उमरा लॅपटॉप मोबाईल इयरबर्ड पेन कुरानचे बक्षीसे वाटप
Nabi-E-Rehmat | नगर - इस्लाम धर्माचा पाया ज्ञान, विचार आणि प्रकाशावर उभारलेला आहे. मानवजातीस मार्गदर्शन करण्यासाठी अवतरलेल्या पवित्र कुरआनमधील पहिले वह़ीचे शब्द होते “इक़रा” म्हणजे वाचा, ज्ञान मिळवा. त्यामुळे इस्लाममध्ये सर्वप्रथम दिलेला आदेश हा शिक्षण घेण्याचा आहे, आणि यावरून ज्ञानाची इस्लामी परंपरा किती भक्कम आहे हे स्पष्ट होते.असे प्रतिपादन क्रीडा शिक्षक वसीम शेख बाॅक्सर यांनी केले.
वर्क फॉर कंम्पॅशन तर्फे पैगंबर जयंतीचे निमित्त साधून राष्ट्रीय स्तरावर पैगंबर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. ज्यामध्ये भारतातून ३० हजार तर महाराष्ट्रातून ८ हजार जणांनी भाग घेतला होता. त्यामध्ये नगरचेही १०७ जणांनी भाग घेतला होता. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर उमरा लॅपटॉप मोबाईल इयरबर्ड पेन कुरान अशी बक्षिसे म्हणून देण्यात आले.
तर स्थानिक स्तरावर भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना अहमदनगर उर्दू हायस्कूल मिसगर लायब्ररी येथे झालेल्या कार्यक्रमात मोठी बक्षिसे प्रथम दुतीय व तृतीय अशी देण्यात आली. व सर्व सहभागींना सर्टिफिकेट देण्यात आले. ज्यामध्ये नगरमधून स्थानिक स्तरावर प्रथम अक्सा तांबोली, द्वितीय फरीन शेख, तृतीय कशिश पटेल यांना बक्षीसे देण्यात आली.
यावेळी पुणे येथील इरफान खाटीक, अनस अन्सारी, अन्वर शेख, आवेस अन्सारी, हनीफ बागवान, वसीम बॉक्सर, सय्यद आरिफ, इनाम तांबटकर, काशीफ खान, जफर खान, फैसल शेख, सुफीयान शेख, शाहरुख शेख, आबीद दुलेखान, मेहबूब खान, अभिजीत वाघ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना वसीम शेख म्हणाले की, इस्लामनुसार समाजाचा खरा विकास हा संपत्ती किंवा सत्ता यात नाही, तर शिक्षणातून घडणाऱ्या सुशिक्षित, सजग आणि सदाचारी माणसांमध्ये आहे. पैगंबर मोहम्मद ﷺ यांनी वारंवार सांगितले की “ज्ञान मिळवणे हे प्रत्येक पुरुष आणि स्त्रीवर बंधनकारक आहे.” या वचनातून समानतेचा संदेश मिळतो.स्त्री–पुरुष, श्रीमंत–गरीब, लहान–मोठे सर्वांना शिक्षणाच्या समान हक्काचा आदेश इस्लाम देतो.
ज्ञान हे केवळ दुनियवी जीवनासाठी नाही, तर आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसाठीही आवश्यक आहे. शिक्षणाने मनुष्याला योग्य–अयोग्य याचे भान येते, समाजात न्याय, सौहार्द आणि प्रगतीची बीजे रोवली जातात. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व केवळ वैयक्तिक विकासापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण उम्मतच्या उभारणीचे शिल्पकार आहे.असे नमुद केले.
प्रास्ताविक करताना इनाम तांबटकर म्हणाले की, प्रेषित ﷺ यांनी कैद्यांनाही माफीची अट म्हणून शिक्षण देणे अनिवार्य केले होते, यावरून इस्लामिक संस्कृतीने शिक्षणाला किती उच्च स्थान दिले होते, हे स्पष्ट होते. इस्लामने जगाला दिलेल्या सुवर्णयुगात गणित, वैद्यक, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, तत्वज्ञान अशा अनेक क्षेत्रांत मोठी भर घातली, कारण आधार होता शिक्षणाचा, शोधाचा आणि विचारस्वातंत्र्याचा.
आजच्या काळातही इस्लामचा हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. ज्ञानाशिवाय कुठलीही प्रगती अशक्य आहे. इस्लाम म्हणतो: शिका, शिकवत राहा, आणि समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवत राहा.म्हणूनच आपण सर्वांनी मुले, पालक, शिक्षक, समाजसंस्था शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन इस्लामने दाखवलेला मार्ग स्वीकारला पाहिजे. कारण जो समाज शिक्षित असतो, तोच समाज प्रगत, सक्षम आणि सामर्थ्यवान असतो असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनीफ बागवान यांनी केले. तर आभार आरिफ सय्यद यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्क फोर कंम्पॅशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com