Maharashtra News | २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

 Maharashtra News |  २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन








मुंबई दि. २६ : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणातील त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.




शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, उद्योजकता व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.




मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची यावेळी भेट घेत त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या. या अभिवादन कार्यक्रमाचे परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक रमेश लोखंडे यांनी संचलन केले. बँड पथकाचे पोलीस निरीक्षक संजय कल्याणे यांनी नेतृत्व केले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक राजेश खुपकर यांनी केले. कार्यक्रमाला शहिदांचे कुटुंबीय, गृह विभागाचे सेवानिवृत्त सनदी अधिकारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या