Ahmednagar College | पर्यावरणपूरक ‘Revive’ स्टार्टअपला मिळाले यश
Ahmednagar College | नगर : दर्शक ।
बीपीएचई सोसायटीच्या अहमदनगर महाविद्यालयातील बीबीए विभागाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी उद्धव राहुल मनियार याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित ‘स्टार्टअप ऑलिम्पियाड 2026’ या प्रतिष्ठित स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, नवकल्पना आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने या भव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक येथे आयोजित बूट कॅम्पपासून या स्पर्धेची सुरुवात झाली होती. या स्पर्धेत सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी सादर करण्यात आलेल्या ६३२ संकल्पनांमधून केवळ ५० स्टार्टअप्सना अंतिम ‘इन्व्हेस्टमेंट रेडी’ टप्प्यासाठी निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेत उद्धव मनियार याने ‘Revive’ या आपल्या स्टार्टअप संकल्पनेसाठी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्टार्टअपद्वारे प्लास्टिक कचऱ्यापासून पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम पॅनल तयार करण्याचे अभिनव मॉडेल सादर करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि कचरा व्यवस्थापन या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारी ही संकल्पना परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.
या उल्लेखनीय यशाबद्दल उद्धवला ट्रॉफी तसेच १५,००० रुपयांचे प्री-सीड फंडिंग स्वरूपात पारितोषिक प्रदान करण्यात आले. या प्रकल्पासाठी त्याला बीबीए विभाग प्रमुख डॉ. तूषिता अय्यर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. आर. जे. बार्नबस यांनी उद्धव मनियार याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी नवकल्पना आणि उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहनही यावेळी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रशासकीय समन्वयक डॉ. नागवडे, प्रभारी प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी, उपप्राचार्य भालसिंग, नॉन-ग्रँट को-ऑर्डिनेटर डॉ. रज्जाक तसेच बीबीए विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
उद्धव मनियार हा अहिल्यानगर येथील सौ. अर्चना राहुल मनियार व श्री. राहुल मनियार यांचा सुपुत्र असून, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
.webp)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com