Mauli Hall | संगीत, कथा आणि नृत्याचा संगम; नगरकरांनी अनुभवला रामभक्तीचा आनंद






Mauli Hall |  नगर : दर्शक । 
जय श्रीराम श्रीरामनवमीच्या पावन दिनी माऊली सभागृहात संपन्न झालेल्या श्री प्रसादजी सोन्याबापू शेटे प्रस्तुत गीतरामायण या भक्तिमय सोहळ्याला रामभक्त नगरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. वेळेपूर्वीच तुडुंब भरलेलं माऊली सभागृह, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बाहेर माऊली सभागृहाच्या प्रांगणात एलईडी स्क्रीन समोर मोठ्या संख्येने उपस्थित भाविक नगरकर बघून हेच म्हणावसं वाटतं की आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या दैवी प्रतिभेतून निर्माण झालेल्या गीतरामायणाची गोडी आजही टिकून आहे.






          कवी श्रेष्ठ रवींद्रनाथांनी म्हटल्याप्रमाणे रामायण ही खरोखरच भारताच्या मौलिक भावभावनांची भागीरथी आहे. भारतीय संस्कृती रामरसात सतत भिजत आलेली आहे आणि गीत रामायण म्हणजे वाङ्ग्मय शारदेच्या रत्नजडित मुकुटातील शिरोमणीच. याची पुनःप्रचिती यावर्षी देखील नगरकरांनी अनुभवली. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर श्री प्रसादजी शेटे यांच्या पुढाकारातून आणि मुख्य स्वरातून साकारलेल्या गीतरामायण या भक्तिमय सोहळ्याला आबाल वृद्ध नगरकरांनी प्रचंड गर्दी,उत्स्फूर्त टाळ्या आणि तोंड भरून दाद देत उदंड प्रतिसाद दिला.







         गीत रामायणातील 56 गीतांपैकी स्वये श्री रामप्रभू ऐकती,कुशलव रामायण गाती, दशरथा घे हे पायस दान, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा,नकोस नौके परत फिरू ग,सेतू बांधा रे सागरी, भूवरी रावण वध झाला, प्रभो मज एकच वर द्यावा, गा बाळांनो श्रीरामायण यांसह निवडक 21 गाणी गायली गेलीत. गायकांचे उत्तम स्वर, वादकांची उत्तम साथ आणि सोबत रामकथेची सुयोग्य गुंफण असा त्रिवेणी संगम या मैफिलीत जुळून आला. यावर्षीच्या मैफिलीचे प्रमुख आकर्षण होते, ज्यांनी खुद्द बाबूजी अर्थात सुधीर फडके यांना गीतरामायण कार्यक्रमांमध्ये साथ केलेली आहे असे दिग्गज व्हायोलिन वादक पंडित रमाकांत जी परांजपे यांची व्हायोलिनची साथ. पुण्याचे श्री शैलेश देशपांडे यांनी बासरी आणि संगमनेरचे श्री सत्यजित सराफ यांनी सिंथेसायझरची साथ केली. सोबत अहिल्यानगरचे ज्येष्ठ संगीत गुरु श्री मकरंद खरवंडीकर सर यांनी हार्मोनियमची साथ केली.तबला साथ होती श्री हर्षद भावे आणि श्री प्रसाद सुवर्ण पाठकी यांची तर तालवाद्य साथ होती श्री कुलदीप चव्हाण यांची. 




         श्री प्रसाद जी शेटे यांच्यासह त्यांची कन्या सौ श्रद्धा बाजारे शेटे आणि नगरच्या सौ रेणुका पवार या दोघींनी सीता, कौसल्या, अहिल्या,शबरी यांच्या तोंडची गाणी सुरेल गायली. कोरस साथ होती कुमारी नेहा दरवडे आणि कुमारी गौरी पवार यांची. गायक वादकांच्या उत्तम सादरीकरणासोबतच या मैफिलीची जमेची बाजू म्हणजे सौ वीणा दिघे यांचे रामकथेचे प्रभावी प्रगल्भ निरूपण. शेवटपर्यंत प्रेक्षकांना रामकथेमध्ये गुंतवून ठेवण्यात गायक वादक निवेदक यशस्वी ठरले.



        यावर्षी गीत रामायणातील काही गाण्यांसाठी श्री प्रसादची शेटे यांच्या स्नुषा सौ श्रद्धा शेटे यांनी सादर केलेले कथक नृत्य हे आणखीन एक आकर्षण ठरले.




या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सन्माननीय प्रायोजक होते प्रोॲक्टिव्ह लाईफ स्टाईल,आरोग्य सदन हॉस्पिटल,बजाज पॉवर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडोस्कल्प.





         विशेष सहकार्य होते गजराज ड्रायक्लीनर्स, विमा प्रतिनिधी मंगेश राजहंस देसाई, कमल फूड्स स्पेशल नगरी झटका, साई सूर्य नेत्रसेवा,ओंकार एंटरप्राइजेस, पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था,द ग्रँड लेगसी महाबळेश्वर,श्री राधे ट्रेडर्स राहुरी,नक्षत्र फूड प्रॉडक्ट्स,संदीप बोरवेल, श्री रवींद्र शेटे मॅक्स लाइफ इन्शुरन्स,जरीवाला स्टोअर्स,माय केअर प्लस आणि नेट विंड यांचे.





        शिवाय गीतरामायण कमिटीचे अध्यक्ष श्री सुरेश काका चव्हाण, उपाध्यक्ष श्री राजहंस देसाई आणि सर्व सदस्य श्री सुभाषराव मिसाळ,श्री राजेंद्र दासरी, श्री बाळासाहेब परभणे,श्री भास्कर मिसाळ आणि श्री जयंत येलूलकर या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.




श्री प्रणव प्रसाद शेटे व श्री पूजा प्रसाद शेटे यांनी कार्यक्रमाच्या इतर सर्व बाबी समर्थपणे सांभाळल्या.श्री प्रसाद शेटे यांच्या गायनाने मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी दरवर्षी या मैफिलीचे आयोजन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.स्वीट होम चे धनेशजी बोगावत,रोकडोबा हनुमान मंदिरचे विश्वस्त श्री मन्नुशेठ झवर, गुरुवर्य प्रसिद्ध सुफी गायक श्री पवनजी श्रीकांत नाईक, व इतर ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती होती.