New Arts College | महिलांना कायद्याचे ज्ञान आवश्यक – डॉ. उज्ज्वला मुसळे
New Arts College | नगर : दर्शक ।
येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अ. नगर (स्वायत्त) येथे जागतिक महिला दिन विद्यार्थिनी वसतिगृह दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) उज्ज्वला मुसळे (दिवाणी न्यायालय, अहिल्यानगर) होत्या. समाजात वावरताना महिलांना कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. उज्ज्वला मुसळे यांनी सामाजिक मर्यादांचे भान ठेवून वागल्यास अनेक अडचणी टाळता येतात, असे सांगितले. व्यक्तिमत्व विकास करताना आरोग्याचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. जि. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या खजिनदार मा. अॅड. दीपलक्ष्मी म्हसे या होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोन करण्याचा संदेश दिला. आई-वडिलांना कधीही दुखवू नका, त्यांचा अभिमान वाढेल असे वर्तन ठेवा आणि शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी बना, असा उपदेशही त्यांनी केला.
या कार्यक्रमासाठी अ. जि. म. विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष मा. श्री. रा. ह. दरे साहेब आवर्जून उपस्थित होते. संस्थेच्या विश्वस्त सौ. अरुणाताई काळे तसेच संस्थेच्या सदस्या कल्पनाताई वायकर, अलकाताई जंगले आणि निर्मलाताई काटे यांनीही विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. स्त्रीत्वाचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो वर्षातील ३६५ दिवस कायम राहायला हवा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेत विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी हिराबाई भापकर यांच्या मौलिक कार्यांच्या स्मृतींनाही त्यांनी उजाळा दिला.
महिला दिनाचे औचित्य साधून मुलींच्या वसतिगृहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक परीक्षण, पत्रलेखन, वक्तृत्व स्पर्धा, स्केच मेकिंग, ब्युटी विथ ब्रेन, मेंदी, संगीत खुर्ची आणि अंताक्षरी अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. जात्यावरच्या ओव्या, भारूड, लावणी, लोकगीत, नाटिका आणि एकांकिका यांसारख्या दर्जेदार सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुनिता मोटे यांनी केले. प्रा. डॉ. सुषमा ताकटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रा. देवकी ढोकणे यांनी विद्यार्थिनींनी आईला लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका देशमुख आणि प्रा. भाग्यश्री तोडकरी यांनी केले, तर प्रा. संगीता निंबाळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापिका व वसतिगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
.webp)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com