Sanman |  कर्तृत्वाचा सन्मान : जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठानतर्फे ‘शक्ती’चा जागर

Sanman | कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणी जाऊन विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार



   Sanman | नगर : दर्शक । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात अहोरात्र कष्ट करणार्‍या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणार्‍या महिलांचा गौरव करण्याचा आगळावेगळा उपक्रम जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे राबविण्यात आला. महिला दिन केवळ साजरा करण्यापुरता न ठेवता समाजाच्या प्रत्येक स्तरात योगदान देणार्‍या महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा पार पडला. विशेष म्हणजे विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत असलेल्या महिलांच्या कार्यस्थळी जाऊन त्यांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.









     या उपक्रमात समाजाचा कणा असलेल्या विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव करण्यात आला. ऊन-पावसाची तमा न बाळगता कष्ट करणार्‍या भाजी विक्रेत्या महिला, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणार्‍या महिला पोलीस प्रशासनातील रणरागिणी, समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या आरोग्य सेविका तसेच न्यायदानासाठी आणि हक्कांसाठी लढणार्‍या महिला वकील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सर्व महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान आणि आनंद हीच या उपक्रमाची खरी पावती ठरली.









     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठानच्या महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी सौ. अर्चना गणेश झिंजे, सौ. शितल किशोर विंचुरकर, सौ. सुजाता अभिजीत अष्टेकर, सौ. रामेश्‍वरी यशवंत कांबळे, सौ. श्‍वेता प्रदीप दळवी, सौ. वृषाली ललित भूमकर, सौ. कोमल गोरख लिमकर, सौ. शारदा संजय तायडे, सौ. वैशाली सुनील आकडे आणि सौ. पुष्पा विनोद पांढरपोटे या सर्व भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. प्रत्येकाने मोठ्या उत्साहाने आणि आत्मीयतेने या सत्कार सोहळ्यात सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच ऊब प्राप्त झाली.









     महिला दिन हा केवळ एक दिवसाचे कौतुक नसून स्त्रियांच्या संघर्षाचा आणि यशाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठानने या उपक्रमातून समाजात मोलाचे योगदान देणार्‍या महिलांना प्रत्यक्ष जाऊन सन्मानित करत महिलाशक्तीला खर्‍या अर्थाने सलाम केला.