अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात पुस्तक दिनानिमित्त विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन











अहिल्यानगर - "शरीर सुदृढ व संपन्न होण्यासाठी जशी व्यायामाची आवश्यकता असते तसेच मनाच्या आणि विचारांच्या सुंदरतेसाठी वाचनाची आवश्यकता असते. ग्रंथ संकलन...त्याचे वाचन आणि त्याची भेट देणे यातून ही सुंदरता अधिक बहरते . जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ही आदर्शवत कृती प्रत्येक कुटुंबातून व्हावी असे प्रतिपादन उद्योजक नंदकुमार आढाव यांनी व्यक्त केले. 



 
 अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात महान लेखक विल्यम शेक्सपिअर यांच्या जयंतीनिमित्त "जागतिक पुस्तक दिनाचे" औचित्य साधून आयोजित पुस्तक प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, संचालिका ज्योती कुलकर्णी, कवी चंद्रकांत पालवे ,राहुल तांबोळी, अविनाश रसाळ, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल ,वाचक , व कर्मचारी उपस्थित होते.        


         कवि चंद्रकांत पालवे यांनी याप्रसंगी बोलताना महान साहित्यिक शेक्सपिअर यांनी त्यांच्या साहित्यातून जगाला मोठी देणगी व आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे .त्यांच्या जयंतीदिनी आपण प्रत्येकाने साहित्याची ,आणि वाचनाची कास धरून आपले जीवन समृद्ध करावे असा आशावाद व्यक्त केला.  


         प्रास्ताविकात ज्योती कुलकर्णी यांनी अहिल्यानगर जिल्हा वाचनालय गेली दोन दशके वाचनाचा समृद्ध वारसा चालवत आहे. उगवत्या पिढीने साहित्यिक शेक्सपियर यांचा आदर्श समोर ठेवून वाचन संस्कृती आपली करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.



         मान्यवरांच्या हस्ते लेखक विल्यम शेक्सपिअर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या साहित्याच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन केले .उपस्थित मान्यवरांचे आभार ग्रंथपाल अमोल इथापे यांनी मांनले.यावेळी वाचक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.