नेप्ती विद्यालयात दहावीनंतरच्या करिअर मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद 


यशस्वी होण्यासाठी योग्य पर्याय निवडा – प्रा. एकनाथ होले










नगर: 


नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री. स्वामी आण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “दहावीनंतर पुढे काय?” या विषयावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बोर्ड परीक्षा होऊन जवळपास एक महिना उलटला असून निकाल लवकरच जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुढील वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती रामदास फुले यांनी दिली. 




         कार्यक्रमात प्रा. एकनाथ होले यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पर्यायांची सविस्तर माहिती देत योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून दिले. दहावीनंतर अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, आयटीआय, डिप्लोमा तसेच विविध कॉम्प्युटर कोर्सेस असे अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीनिवडी, क्षमता आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन शाखा निवडावी. यशस्वी होण्यासाठी योग्य पर्याय निवडा असे प्रतिपादन प्राध्यापक एकनाथ होले सर यांनी केले. 




       ते पुढे म्हणाले की, सायन्स शाखा निवडल्यास इंजिनिअर, डॉक्टर, संशोधक आणि तज्ज्ञ शास्त्रज्ञ होण्याच्या संधी उपलब्ध होतात, तर कॉमर्स शाखेतून सीए, सीएस यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रात करिअर घडवता येते, असेही त्यांनी नमूद केले. तसेच कला शाखेतून शिक्षक, प्राध्यापक, वकील तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे मार्ग खुले होतात. “योग्य दिशा निवडल्यासच यश निश्चित आहे. 




दहावी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून या टप्प्यानंतर घेतलेला निर्णय पुढील करिअर घडवतो. त्यामुळे केवळ इतरांच्या सांगण्यावरून नव्हे, तर स्वतःच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार निर्णय घ्या. प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे.


सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स कोणतीही शाखा कमी किंवा जास्त नाही. प्रत्येक शाखेत प्रगती करण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. आजच्या काळात कौशल्याला जास्त महत्त्व असून, विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करावीत, असेही त्यांनी नमूद केले.




       स्पर्धा परीक्षा जसे की एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन यांसारख्या परीक्षांद्वारे प्रशासनात जाण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विशेषतः कला शाखेतील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी प्राध्यापक गोविंद कदम व अन्य मान्यवरांची भाषणे झाली. 




        या कार्यक्रमास मुख्याध्यापक संभाजी जाधव, प्राध्यापक गोरक्ष कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, नानासाहेब घोडके ,राजेंद्र झावरे, बाबासाहेब भोर, गोरक्षनाथ कोतकर ,शिवाजी जाधव ,सविता कोरडे, श्रद्धा भांड, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.