९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या २१ विद्यार्थ्यांचा गौरव; शाळेचा निकाल उंचावला

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या गुणवंतांचा भव्य सत्कार






नगर (प्रतिनिधी):
अहिल्यानगर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) मध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकूण २१ विद्यार्थ्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.



        या कार्यक्रमाला प्राचार्य, उपमुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षीचा दहावीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत अधिक चांगला लागल्याने शाळेत आनंदाचे वातावरण होते. मागील वर्षी ११ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले होते, तर यंदा ही संख्या वाढून २१ वर पोहोचल्याने शाळेच्या गुणवत्तेत झालेली वाढ अधोरेखित झाली.




        शाळेचे प्राचार्य मा. मंगेश जगताप यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “आजचा हा समारंभ आपल्या शाळेसाठी अभिमानाचा क्षण आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. पुढील वर्षी याहून अधिक चांगला निकाल लागेल, असा विश्वास आहे.” त्यांनी यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्वही अधोरेखित केले. तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा हे विद्यार्थ्यांच्या यशाचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले.




        यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून श्री. सचिन धस, श्री. चंद्रकांत ऊरमुडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी कठोर परिश्रम आणि सातत्याचे महत्त्व स्पष्ट करत शाळेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.




        कार्यक्रमात बिनिश काझी, विनय चेडे, ऐश्वर्या व्यास आणि सिद्धी उरमुडे या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील अनुभव कथन केले. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्वतःवर विश्वास या घटकांमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.




या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य मा. मंगेश जगताप, उपप्राचार्य शगुफ्ता काझी, सीनियर एडमिन ऑफिसर आशुतोष नामदेव, एडमिन ऑफिसर नितीन गवांदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील आर्या बाजड आणि संस्कृती माने यांनी केले.