मनपाच्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयात 'आदर्श आपले सरकार सेवा केंद्रा' चे उद्घाटन

नगर : दर्शक । दि २९ एप्रिल २०२६ ।   नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून सावेडी प्रभाग समिती कार्यालय येथे 'आदर्श आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्यात आले आहे.


नगर : दर्शक । दि २९ एप्रिल २०२६ । 

नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून सावेडी प्रभाग समिती कार्यालय येथे 'आदर्श आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखल्यांसह विविध ७० सेवा उपलब्ध होणार आहेत. नागरिकांना त्यांच्याच भागात या माध्यमातून सेवा मिळेल. लवकरच इतर प्रभाग समिती कार्यालयातही असे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले.


 



या सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी महापौर गाडे बोलत होत्या. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, उपायुक्त मेहेर लहारे, नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, रोहन सानप, प्रभाग अधिकारी बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.


महापौर गाडे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध सेवा पुरविल्या जातात. नागरिकांना अधिक वेगाने आणि त्यांच्या परिसरातच सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सावेडी प्रभाग समिती कार्यालयात आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. लवकरच महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अशाच प्रकारची सेवा सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.



आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, लोकसेवा हक्क दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या माध्यमातून ७० ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर आकारणी, विवाह नोंदणी, थकबाकी नसल्याचा दाखला, नळ कनेक्शन तसेच इतर महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता त्यांची कामे तातडीने मार्गी लागावीत, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.



डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून शासकीय कार्यालयांतील फेऱ्या कमी होतील. सेवा वितरणात पारदर्शकता वाढेल आणि तक्रारींमध्येही घट होईल.



यावेळी उपायुक्त मेहेर लहारे यांनी 'आदर्श आपले सरकार सेवा केंद्रा'च्या विविध सुविधांची माहिती दिली. नागरिकांना ऑनलाइन अर्ज, प्रमाणपत्रे, कर भरणा, नोंदणी सेवा आणि इतर कागदपत्रांची प्रक्रिया एका ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.



कार्यक्रमाच्या शेवटी सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा देण्याची शपथ घेतली