निर्भिक इतिहास संशोधक आणि पत्रकारांची परंपरा भूषण देशमुख यांनी गौरवीत केली : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

निर्भिक इतिहास संशोधक आणि पत्रकारांची परंपरा भूषण देशमुख यांनी गौरवीत केली : माजी मंत्री बाळासाहेब थोरात








अहिल्यानगर, दिनांक 11 जून 2026


अहिल्यानगर जिल्ह्यात पत्रमहर्षी वा.द. कस्तुरे - दिनमित्रकार मुकुंदराव पाटील इ.पत्रकार आणि सुरेश जोशी - सरदार मिरीकर यांच्यासारख्या इतिहास संशोधकांनी 

निर्भिकता आणि निष्पक्षतेची एक परंपरा निर्माण केली. पत्रकार आणि इतिहास संशोधक म्हणून या परंपरा भूषण देशमुख यांनी  गौरवीत केल्या . नगरची सद्भावनेची संस्कृती आणि खरा इतिहास तळमळीने मांडणारा वैचारिक विश्वातील अढळ ध्रुवतारा भूषण यांच्या निधनामुळे हरपला, अशा शब्दात  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


स्वर्गीय देशमुख यांच्या कुटुंबीयांची आज श्री. थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत इतिहासप्रेमी, हेरिटेज व उपक्रम  आणि सामाजिक  कार्यकर्ते  होते.


 पत्रकार आणि इतिहास संशोधक म्हणून भूषण यांच्याशी जुळलेल्या ऋणानुबंधाला श्री.थोरात यांनी उजाळा दिला. सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी भूषण यांच्या समवेत नगर मधील सर्व ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या  आणि तेथील इतिहास जाणून घेतला.



"भूषण यांच्या समवेत नगरच्या पंचक्रोशीतील ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्यावर आपण जगातल्या अद्वितीय शहर आणि जिल्ह्यात राहतो , याची जाणीव होते," ही त्यावेळी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली भाऊसाहेबांची प्रतिक्रिया श्री बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून नमूद केली.


श्री थोरात म्हणाले की,दैनिक केसरी ,लोकसत्ता, दिव्य मराठी इत्यादी वृत्तपत्रात काम करीत असताना त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती  आणि प्रामाणिकतेने सर्वांना प्रभावित केले. रेडिओ नगर 90.4 एफएम हे रेडिओ माध्यम त्यांनी सर्वसामान्य नगरकरांचे व्यासपीठ बनवले. इतिहास कोणाला बदलता येत नाही आणि तो कोणाला माफही करत नाही, हे परखडपणे सांगणारे देशमुख हे निजामी आणि मराठा इतिहासाचे साक्षेपी भाष्यकार होते.



 कला -  साहित्य - संस्कृती या विषयांची सखोल जाण आणि रुची असणाऱ्या देशमुख यांची स्मृती आणि प्रेरणा पुढील पिढीसाठी अमूल्य संचित आहे, असे श्री थोरात म्हणाले. श्री देशमुख यांच्या जीवनकार्याची प्रेरणा अखंड प्रज्वलित ठेवण्यासाठी स्थायी स्वरूपाची योजना नगर शहरात निर्माण करण्यासाठी आपण सहयोग देऊ,असेही  श्री. थोरात यांनी सांगितले..