मुख्याध्यापकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत शिस्त, प्रामाणिकपणा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अंगीकारावा – शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे

अहिल्यानगरचे ‘शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान-२०२६’ राज्यासाठी दिशादर्शक




नगर : दर्शक । दि २ जुलै २०२६ । 
अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक कार्यशाळेत शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान-२०२६’ या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक व अनुकरणीय ठरेल, असे गौरवोद्गार काढले. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी मुख्याध्यापक संघाने केलेले नियोजन आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.





           कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजना, प्रशासकीय बदल, डिजिटल प्रणाली आणि गुणवत्तावाढीच्या उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.




          आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे म्हणाले की, बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत मुख्याध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनातील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी मुख्याध्यापकांनी नेतृत्वक्षम भूमिका बजावणे आवश्यक आहे. गुणवत्ता, शिस्त, नियोजन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समन्वय साधल्यास शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना प्रत्येक मुख्याध्यापकाने जबाबदारीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे काम करावे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षण आणि अनुशासनाची जपणूक होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.




           ते पुढे म्हणाले की, 'शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान-२०२६' हा उपक्रम केवळ अहिल्यानगरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरेल. शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केल्यास शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल. प्रत्येक शाळेने आपल्या परिसरात गुणवत्ता चळवळ उभी करून उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.



           डॉ. मोरे यांनी इयत्ता अकरावी-बारावी प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, ऑनलाईन प्रस्ताव, पोस्ट क्रिएशन, यू-डायस, 'सरळ' प्रणाली, तसेच विविध प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दैनंदिन कामकाज नियमित, शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याबरोबरच स्वीकारलेले कार्य आनंदाने, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने पूर्ण करण्याचा संदेश त्यांनी दिला.


          जिल्हा शिक्षणाधिकारी सौ. संध्या गायकवाड यांनी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील विविध समित्यांची स्थापना, माजी विद्यार्थी संघ पोर्टल, शिक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, आधार व अपार आयडी अद्ययावत करणे तसेच शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक शाळेने शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.



            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी जिल्हा मुख्याध्यापक संघाने वर्षभरात राबविलेल्या विविध शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा आढावा घेतला. पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, मुख्याध्यापक कार्यशाळा तसेच पुणे विभागीय शिक्षण मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रलंबित असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली.



          यावेळी प्राचार्य पंडित यांनी मुख्याध्यापक संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शाळांकडून ऑनलाईन व ऑफलाईन माहिती केवळ शनिवारीच मागविण्याचा निर्णय शासनाने स्वीकारल्याबद्दल शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाचे अभिनंदन केले. हा निर्णय मुख्याध्यापक संघाच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी प्रत्येक शनिवारी आवश्यक माहिती वेळेत सादर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.




         कार्यशाळेत उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, सरचिटणीस मिथुन डोंगरे, नगर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानदेव बेरड, प्राचार्य जाधव, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, दत्ता पाटील नारळे, उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे कार्यालय अधीक्षक बाबुराव जाधव व श्री चव्हाण  यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित होते.




         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य ज्ञानदेव बेरड व संभाजी पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांनी केले. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा, प्रशिक्षण उपक्रम आणि मुख्याध्यापकांच्या सक्रिय सहभागातून जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.