शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारत श्रीकृष्ण बालमंडळाचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
नगर : श्रमिकनगर परिसरातील श्रीकृष्ण बालमंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत स्वतःच्या हाताने शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारली आहे. मंडळाचे सेक्रेटरी कृष्णा भास्कर श्रीगादी यांनी मूर्ती तयार करण्यात पुढाकार घेतला असून, मंडळातील कार्यकर्त्यांनी या मूर्तीचे रंगकामही स्वतः केले. पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक विचारातून साकारलेल्या या गणेशमूर्तीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या वाजत-गाजत मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने श्रमिकनगर परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाने ‘विठ्ठलाची वारी’ ही संकल्पना घेऊन मंडपाची आकर्षक सजावट केली आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीमय वातावरणाची अनुभूती देणारी ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे मूर्ती तयार करण्यापासून तिचे रंगकाम, मंडप उभारणी आणि सजावट करण्यापर्यंतची बहुतांश कामे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः केली आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून मंडळाचे कार्यकर्ते गणेशमूर्ती तयार करणे, रंगकाम करणे आणि मंडप सजविण्याच्या कामात व्यस्त होते. स्वतःच्या श्रमातून आणि कल्पकतेतून त्यांनी गणेशोत्सवाची तयारी पूर्ण केली. त्यामुळे श्रमिकनगर परिसरात श्रीकृष्ण बालमंडळाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत असून, तरुणांनी उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा आदर्श या मंडळाने निर्माण केला आहे.
श्रीकृष्ण बालमंडळाचे पदाधिकारी : अध्यक्ष अथर्व प्रशांत येमुल, उपाध्यक्ष मानस नरेश कोमटी, सेक्रेटरी कृष्णा भास्कर श्रीगादी, खजिनदार अभिषेक भास्कर श्रीगादी, सदस्य रियांश सचिन गळांगे, प्रथमेश विनायक येमुल, यथार्थ श्रीनिवास बुरगूल, हर्षित शुभम येमुल, कु. संस्कृती विनायक येमुल व कु. आराध्या प्रशांत येमुल.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com