SIR Nagar | दावे-हरकतींची काटेकोर छाननी करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
SIR Nagar | नगर : दर्शक ।, दि. ११ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा): मतदार यादी सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान करताना प्रत्येक मतदाराची नोंद अचूकपणे तपासून मतदार यादी अद्ययावत, पारदर्शक व विश्वासार्ह करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पात्र मतदाराचे नाव कोणत्याही परिस्थितीत चुकीने वगळले जाणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. प्राप्त दावे व हरकतींची नियमानुसार वस्तुनिष्ठ व काटेकोर छाननी करून संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि नागरिकाभिमुख पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा तसेच सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे, विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच संबंधित मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
दावे व हरकतींवर पारदर्शक निर्णय घ्या
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या बीएलओंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बीएलओंकडून सुरू असलेल्या कामाचा नियमित आढावा घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना द्याव्यात. प्रत्येक मतदाराची नोंद काळजीपूर्वक तपासताना संबंधित कागदपत्रे, उपलब्ध माहिती आणि प्रत्यक्ष पडताळणी यांचा योग्य समन्वय साधावा.
मतदार यादीत एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असणे, मतदाराचे स्थलांतर होणे, मृत्यू झालेला असणे किंवा अन्य कारणांमुळे नोंदीमध्ये बदल आवश्यक असल्यास तसेच प्राप्त होणा-या दावे व हरकतींची योग्य पध्दतीने तपासणी करुन अंतिम निर्णय घ्यावा.
मतदारांच्या सुविधेला प्राधान्य
आगामी काळात मतदान केंद्रांची रचना करताना मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. मतदान केंद्राचे स्थान, मतदारांची संख्या, प्रवेशाची सुलभता तसेच उपलब्ध मूलभूत सुविधा यांचा विचार करून मतदारस्नेही मतदान केंद्रांची रचना करावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि इतर गरजू मतदारांना मतदान करताना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, याकडेही लक्ष द्यावे, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
नागरिकांनीही मतदार यादी तपासावी
मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय तसेच अन्य तपशील अचूक आहेत का, याची नागरिकांनी स्वतःही खात्री करावी. नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून नियमानुसार दुरुस्तीची कार्यवाही करून घ्यावी. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असल्याने पात्र नागरिकांना नोंदणी, दुरुस्ती अथवा आवश्यक बदल करण्याची संधी उपलब्ध आहे.
मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाचा हक्क सुरक्षित राहील आणि प्रत्येक नोंद अचूक राहील, यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची सद्यस्थिती, प्राप्त अर्ज, नोंदींची पडताळणी आणि आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. बैठकीत उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना मांडल्या. प्रशासनाने या सूचनांची नोंद घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com