Ahmednagar Congress : शहर काँग्रेसने मध्यरात्री केले अनोखे आंदोलन
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहरातील निकृष्ट रस्त्यांचा भांडाफोड शहर काँग्रेस Ahmednagar Congress : कडून सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री रात्री शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या बाजारपेठेतील रस्त्यावर काँग्रेसने आंदोलन केले. शनी चौक ते होशिंग हॉस्पिटल दरम्यान मनपाने प्रभाग क्रमांक १२ मध्ये केलेला सिमेंटच्या नवा कोरा रस्ता अवघ्या चार-पाच महिन्यांमध्ये गायब झाला आहे. या रस्त्यावर ' भ्रष्टाचाऱ्यांना ७० %.. रस्त्याला ३० %... ' असे लिहीत काँग्रेसने नगरकरंच्या वतीने मनपा, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी आंदोलनात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे सहभागी झाले होते. आंदोलन करण्यापूर्वी सर्वांनी प्रभू श्रीराम आणि बजरंग बलीचे मंदिरात जात दर्शन घेतले. जय श्रीराम, जय बजरंग बलीचा जयघोष केला. त्यानंतर नागरिकांच्या रोजच्या आयुष्यातील जगण्या-मरणाशी निगडित असणाऱ्या रस्त्यासारख्या ज्वलंत सार्वजनिक प्रश्नाला वाचा फोडली. रस्त्याच्या कामांत ७० % टक्के कमिशन खाणे सुरू आहे. केवळ ३० % च रक्कम प्रत्यक्षात रस्त्यावर खर्च केली जाते. मग हे रस्ते कसे दर्जेदार तयार होतील, असा संतप्त सवाल काळे यांनी केला आहे.
हा वर्दळीचा रस्ता आहे. भिंगारवाला चौक ते कोतवाली पोलीस स्टेशन ते जुन्या मनपाच्या चौकापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. हा रस्ता व्हावा अशी व्यापारी, नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी मनपाने लोकप्रतिनिधींच्या आग्रहातून सिमेंट काँक्रीटीकरण करत शनि चौक ते होशिंग हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता पूर्ण केला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा औट घटकेचा ठरला असून रस्ता गायब झाला आहे. येत्या पावसाळ्यात उरलेला रस्ता देखील पूर्ण वाहून जाईल. नगरकरांच्या तोंडाला भ्रष्टाचारांकडून पाने पुसली जात असल्याचा घाणाघात काळे यांनी केला आहे.
काळे म्हणाले की, मनपा ७० % कमिशन राज सुरु आहे. शहरातील रस्त्यांची ऑनफिल्ड तपासणी करण्याचे काम काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. चार-पाच महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ता गायब होणे हे म्हणजे जनतेचा भ्रष्टाचाऱ्यांवर दबाव नसल्यामुळे आणि ज्या लोकप्रतिनिधींवर यांना जाब विचारण्याची जबाबदारी आहे तेच मलिदा खाण्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे लूट सुरू आहे. सत्तेत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे सभागृहात नागरिकांच्या वतीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवायला कुणी तयार नाही. मात्र संगनमताने सुरू असणाऱ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे.
दरम्यान, काँग्रेसने निकृष्ट काम झालेल्या रस्त्यावरच लिहीलेले घोषवाक्य या रस्त्याने ये-जा करणारे नागरिक थांबून-थांबून वाचत आहेत. काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी भ्रष्टाचाऱ्यांवर मनपाने गुन्हे दाखल न केल्यामुळे काळे १ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोर आत्मदहन करणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते घोटाळा प्रकरण नगरकरांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या निकृष्ट कामांचा भांडाफोड काँग्रेस सातत्याने करत राहणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com