जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) : माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब बोठे तर उपसभापतिपदी रभाजी सूळ यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापतिपदाच्या दोन्ही जागांसाठी एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक देविदास घोडेचार यांनी काम पाहिले.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने सर्व १८ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत नगर तालुका महाविकास आघाडीचे चौथ्यांदा पानिपत झाले. सोमवार दि. २२ रोजी नूूतन संचालकांची विशेष सभा झाली. या सभेत सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापती पदासा व उपसभापतिपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
सभापती व उपसभापतिपदाचे नाव शिवाजी कर्डिले,भानुदास कोतकर,अरुण जगताप यांच्या कडून निश्चित करण्यात आले. सभापतिपदासाठी भाऊसाहेब बोठे, सुधीर भापकर, संतोष म्हस्के यांची नावे चर्चेत होती, तर उपसभापतिपदासाठी मधुकर मगर व रभाजी सूळ यांची नावे चर्चेत होती. सर्व नूतन संचालकांची सोमवारी सकाळी बुर्हाणनगर येथे बैठक झाली. सभापती-उपसभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यानंतर बंद पाकिटात सभापती व उपसभापतींची नावे देण्यात आली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व नूतन संचालक पदाधिकांर्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com