Ahmednagar News: बैलगाडा प्रेमींनी आनंद व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले
Ahmednagar News: अहमदनगर : सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवत राज्यातील बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. नगरमधील बैलगाडा प्रेमींनी आनंद व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शहरातील बैलगाडाप्रेमी माजी नगरसेवक किशोर डागवाले, सनी जाधव, रोहित डागवाले, अक्षय जाधव, रोहन डागवाले यांनी हळदीची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात नाचून आनंद व्यक्त करून जल्लोषात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी डागवाले जाधव परिवाराच्या वतीने बैलगाडा शर्यतीत पळणार्या सर्जा शिवा या जिल्ह्यात नावाजलेल्या बैलजोडी व घोड्यांसह आनंद व्यक्त केला.
यावेळी किशोर डागवाले म्हणाले, बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची शान व वैभव आहे. पुना, नाशिक, कोल्हापूर खालोखाल आता नगरमध्येही मोठ्याप्रमाणात बैलगाडाप्रेमी असल्याने बैलगाडा शर्यती आता नगरमध्येही रंगत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाने सर्व बैलगाडा प्रेमी दिवाळी सारखा आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या १७ वर्षांपासूनची बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी तत्कालीन भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शर्यतीत बैलांवर कोणताही अत्याचार न करता त्यांचा कोणताही छळ होत नसतो, असा अहवाल देत ही बंदी उठवण्यासाठी विधिमंडळात कायदा केला होता.
तो आज सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरल्याने या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीसांना जाते. ग्रामीण भागातील जत्रा यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यत हे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे शेतकरी मोठ्या हौसेने शर्यतीत पळणार्या बैलांची आपल्या मुलाप्रमाणे देखभाल घेऊन जपतो आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पदाधिकारी, बैलगाडाप्रेमी व शेतकरी म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. आता नगरमध्येही मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतिचें आयोजन डागवाले - जाधव परिवार व रुबाबा उद्योग समूह करणार आहे.
अक्षय जाधव म्हणाले, बैलगाडा शर्यती बाबतीत आज खूप मोठा निर्णय झाला आहे. बैलगाडा प्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे आम्हला सर्वांना खूप आनंद झाला आहे. डागवाले व जाधव परिवार बर्याच वर्षांपासून बैलगाडा शर्यत प्रेमी आहोत. आमच्याकडे असलेले बैलं खूप फेमस असून अनेक जिल्ह्यातील व बाहेरील मोठमोठ्या शर्यतीमध्ये ते जिंकले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नावाजलेल्या सर्जा शिवा या बैलजोडीला नुकतीच ३५ लाख रुपयाला मागणी आली आहे. या बैलांमुळे आमचा लौकिक सर्वत्र वाढत आहे. यावेळी पांडुरंग शिंदे, सुजित शिंदे, नवनाथ वाव्हळ, प्रवीण नाबगे, अमन शेख व भैय्या शिंदे आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com