वसंत व्याख्यानमाला पुष्प चौथे
अहमदनगर (प्रतिनिधी) - द्विशतकाकडे वाटचाल करणार्या 185 वर्षांच्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात देवीप्रसाद सोहोनी यांनी सादर केलेल्या त्यांच्या शंभराव्या ‘आता कशाला उद्याची वाट’ या एकपात्री प्रयोगाला दर्दे रसिकांची वाहऽवाह मिळाली.
अहमदनगर जिल्हा वाचनालयाने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत चौथ्या व अखेरच्या पुष्पात देवीप्रसाद सोहोनी यांनी ‘आता कशाला उद्याची वाट’ हा योगिनी सोहोनी लिखित एकपात्री प्रयोग सादर केला. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, संचालिका शिल्पा रसाळ, प्रा.ज्योती कुलकर्णी, राहुल तांबोळी, किरण आगरवाल, चंद्रकांत पालवे आदि उपस्थित होते.
श्री. सोहोनी यांनी मुंबई, पुणे, नगर आणि विदर्भ येथील इरसाल व्यक्तींचे नमुने सादर केले. पुणेरी पाट्यांवरही भाष्य करीत सुमारे दीड तास सोहोनी यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवले. आपली प्रगती होताना निसर्गाची हानी होत आहे का याकडे लक्ष द्या, नुसती सिमेंटची जंगले निर्माण करु नका, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जमिनीत मुरवा, असे सामाजिक संदेश श्री.सोहोनी यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून दिले.
कशाला उद्याची वाट मध्ये पाऊस केंद्रस्थानी होता. कधी पावसाची चातकासारखी वाट पहावी लागते, तर कधी धो-धो बरसणारा पाऊस कधी थांबेल याची प्रतिक्षा करावी लागते. पाऊस आणि त्याचे जनमानसावर होणारे परिणाम त्यांनी सादर केले.
प्रास्तविक प्रा.शिरिष मोडक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.कुलकर्णी यांनी करुन दिला. आभार शिल्पा रसाळ यांनी मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल अमोल इथापे, उपग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, संकेत फाटक, कुमार गेंट्याल, संजय गाडेकर, विठ्ठलराव शहापुरकर, श्री.शेख यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com