सेवाव्रती स्व.विठ्ठलराव नारायण मंगलारम सर स्मृती जीवनगौरव पुरस्कार २०२३ चे वितरण उत्साहात संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) - सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मगाव असणाऱ्या 'जोर्वे' गावात मंगलारम सर मुख्याध्यापक म्हणून आले, आपल्या कामाचा ठसा त्यानी त्या ठिकाणी उमटवला. ज्यांनी सतरा वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचा कारभार यशस्वीपणे सांभाळला असे मा मंत्री बाळासाहेब थोरात हे मंगलारम सरांचे विद्यार्थी. सर स्वतः बोलण्यापेक्षा कृतीवर भर असणारे एक कृतिशील व्यक्तिमत्व होते, अश्या कृतिशील व्यक्तिमत्व असणाऱ्या स्व. विठ्ठलराव नारायण मंगलारम सर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अश्याच कृतिशील व्यक्तींना अर्थात जेष्ठ विधिज्ञ ऍड डॉ रामदास सब्बन व जेष्ठ साहित्यीक मुकुंदराज शिंगारम यांना दिला गेला, हे कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले.
स्व. विठ्ठलराव नारायण मंगलारम स्मृती जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३ चे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य हिरालाल पगडाल, अशोक कुरापटी, शहर सहकारी बँकेचे संचालक दत्ताशेठ रासकोंडा, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम सर, मासिक पद्मशाली प्रेरणाचे उपसंपादक प्रा वीरभद्र बत्तीन सर, सेवानिवृत्त तहसिलदार राधाकीसन म्याना, कुमार आडेप व रघुनाथ गाजेंगी उपस्थित होते.
पंढरीच्या पांडुरंगाचे नाव धारण करणाऱ्या विठ्ठलराव मंगलारम सरांनी त्या विठूराया सारखेच कायम सर्वसामान्यांच्या गोतावळ्यात रममाण झाले. कुठल्याही समाजाच्या उत्कर्षात मध्यमवर्गीय समाज महत्वाचे योगदान देत असतो, अहमदनगर शहरात पद्मशाली समाजात हा मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आणि त्याच्या जडणघडणीत मंगलारम सरांचे योगदान अतुलनीय राहिले. ते सेवाव्रती वृत्तीचे होते आणि त्यांनी अनेक संस्था संघटनाबरोबरच मासिक पद्मशाली प्रेरणा मासिकला राज्यात नावलौकिक मिळवून देतांना पद्मशाली समाजाचे मुखपत्र म्हणून ओळख मिळवून दिली, असे मुख्य अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य हिरालाल पगडाल सर म्हणाले. यावेळी मासिक पद्मशाली प्रेरणाचे संपादक ज्ञानेश्वर मंगलारम, अशोक कुरापटी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या ह्र्दय सत्काराने भारावून गेलेले सत्कार मूर्ती ऍड. डॉ. रामदास सब्बन सत्काराला उत्तर देतांना म्हणाले "मंगलारम सर हे सेवाव्रती वृत्तीचे होते, ते स्वतः समर्पित जीवन जगले. सरांसारख्या व्यक्तीमुळे सामजिक परिवर्तन घडून येते. सरांचा हा आदर्श घेऊन आपणही, विशेषतः शिकलेल्या तरुणाईने पुढे येण्याची गरज आहे. मी स्वतः बुद्धी प्रामाण्यवादाच्या मदतीने कुठलेही आर्थिक, राजकीय पाठबळ पाठीशी नसतांना राज्याच्या अटर्णी जनरल -कॅबिनेट मंत्री दर्जा पर्यंत मजल मारली, तर आपणही प्रयत्नाने निश्चित यश मिळवू शकता. सरांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मला मिळतोय याचा मला मनस्वी आनंद आहे .
तर "मंगलारम सरांनी वंचित, शोषित घटकांसाठी आपले जीवन समर्पित केले. राज्यभर त्यांचा जनसंपर्क होता, पद्मशाली प्रेरणा, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महासंघमच्या माध्यमातून आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. माझ्या मार्कंडेय महामुनींच्या चरित्राच्या संशोधन कामाला त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. सरांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला मिळाला याचा मला मनापासून आनंद आहे, असे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगु भाषेत लेखन करणारे जेष्ठ साहित्यिक व यंदाच्या पुरस्काराचे दुसरे मानकरी मुकुंदराज शिंगारम सत्काराला उत्तर देतांना म्हणाले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सेवाव्रती पुस्तक, मार्कंडेय महामुनींची प्रतिमा आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रमुख अतिथींचा परिचय कु प्रणाली आडेप व प्रा शरद मेढे सर यांनी करून दिला तर सत्कारमुर्तींच्या मानपत्राचे वाचन श्रीम. अनिता मंगलारम व वैशाली मंगलारम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनी करतांना सरांच्या सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनाचा इतिवृत्तांत मांडतांना पुरस्कार वितरणामागची भूमिका ही थोडक्या मांडली. सूत्र संचालन साईगीता सब्बन आणि श्रीनिवास एल्लाराम यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण गोटीपामुल सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी श्री अशोक कुरापट्टी, दत्तात्रय रासकोंडा रघुनाथ गाजेंगी, अरुण तडका, नारायण मंगलारम, नितीन गाली,श्रीनिवास एल्लाराम, लक्ष्मण इगे, व्यंकटेश नक्का, कुमार आडेप, श्रीनिवास भीमनाथ, ज्ञानेश्वर मंगलारम, सागर सब्बन, सिताराम ढगे, अमोल गाजेंगी, बालकिसन आकुल, सौ साईगीता सब्बन, तनिष्का मंगलारम, प्रणाली आडेप, सिद्धी मंगलारम आदींनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com