Crime News: अॅड. मनीषा आणि त्यांच्या पतीचा निर्घृण खून ; जिल्हा हादरला

Crime News: अॅड. मनीषा आणि त्यांच्या पतीचा निर्घृण खून ; जिल्हा हादरला



राहुरी न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या आढाव दाम्पत्याचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय  52) आणि अॅड. मनिषा आढाव (वय ; 42) असे या दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. 


दोघांनाही दगड बांधून विहिरीत टाकल्याचे निदर्शनास आले असून शुक्रवारी सायंकाळी दोघांचे 

मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना अटक केली असून दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पक्षकार आणि वकिलांमध्ये फीवरून झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.


अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय 52) आणि अॅड. मनिषा आढाव (वय  42) हे वकिल दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढव वस्ती येथे रहात होते आणि दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करत होते. गुरुवारी दुपारपर्यंत ते न्यायालयात होते आणि  त्यानंतर नगर येथे गेले. तिथून त्यांनी पक्षकाराला पाठवून पत्नी मनिषालाही बोलावून घेतले. तेव्हापासून दोघेही बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू होता.



शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अॅड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी (क्र. एम एच 17 ए इ 2390) ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. या गाडीजवळ एक डस्टर गाडीही उभी होती. पोलीस येत असल्याचे पाहून त्यांनी गाडी सुसाट पळवली मात्र पोलिसांनी पाठलाग करून गाडी अडवली. 


गाडीची तपासणी केली असता आत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आला. तपासा दरम्यान पोलीस पथकाला शनिवारी दुपारी आढाव यांची दुचाकी (क्र. एम एच 17 ए डब्लू 3207) ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँकेसमोर बेवारस मिळून आले.


सदर घटनेनंतर नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्याचा शोध घेत होते. या दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डस्टर गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण व आणखी एक अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले. 

पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. संशयित म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार आहे.


आरोपींनी 25 जानेवारी 2024 रोजी दुपारी आढाव दाम्पत्याचे अपहरण केले आणि त्यांना त्यांच्या मानोरी येथील घरी घेऊन गेले. तेथे दोघांचा खून करून रात्रीच्या दरम्यान त्यांचे मृतदेह दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीत टाकून दिले. 


मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिथे धाव घेत बारवमधील पाणी चार ते पाच विद्युतपंपाने उपसून आढाव दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर काढले. या हत्येत आणखी दोन जण संशयितांची नावे ताब्यात घेतलेल्यांनी सांगितली आहेत.ते पसार असून, गुन्हे शोध पथक त्यांचा शोध घेत आहे.

आढाव यांच्या एका पक्षकारानं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.