कै.वि.ल.कुलकर्णी प्राथमिक शाळेत माता-पालक उद्बोधन मेळावा
अहमदनगर (प्रतिनिधी) - आई म्हणजे हक्काचा विसावा, आई म्हणजे परमेश्वराने दिलेली देणगी, जिच्यामुळे संस्कार, संस्कृती व परंपरा यांची जपवणूक होत असते. तिचा सन्मान होणे आज काळाची गरज बनली आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांनी आपण आईमुळे घडलो असल्याचे सांगितले आहे. स्त्री ही घर, समाजाचा आधार आहे, असे प्रतिपादन सौ.सविता काळे यांनी केले.
दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कै.वि.ल.कुलकर्णी प्राथमिक शाळेत माता-पालक उद्बोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सौ.सविता काळे, डॉ.पंकज मुळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा विजया रेखे, सचिव सुनिल रुणवाल, मुख्याध्यापिका प्रतिभा धरम, सौ.निला मुळे, सौ.अनुराधा जोशी आदि उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन व ज्येष्ठ समाजसेविका यमुनाबाई मुळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी डॉ.पंकज मुळे यांनी ‘आरोग्य हीच आयुष्याची गुरुकिल्ली’ आहे हे सांगतांना बदलत्या काळात येणारी सर्व स्थित्यंतरे समर्थपणे पेलण्यासाठी स्त्रियांनी स्वत:चे आरोग्य, स्वत:च्या संवेदना जपणे किती महत्वाचे आहे, योग्य प्रमाणात शांत झोप, विश्रांती, आहाराकडे स्त्रियांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी स्व.यमुनाबाई मुळे यांच्या स्मरणार्थ ‘आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार’ सौ.सुरेखा कोळी यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्तविक मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा धरम यांनी केले. यावेळी विविध उपक्रम, स्पर्धा यात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मेघा पवार यांनी केले. सौ.वैशाली भारदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सौ.विद्या खडके, सौ.स्नेहल बंड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माता-पालक बहुसंख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com