जागतिक विज्ञान दिनानिमित्त सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या विज्ञान जत्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, आकलन व कृतीशीलता यावी यासाठी सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या वतीने यंदाही विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, बालरोग तज्ञ डॉ. पियूष खंडेलवाल, नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा खंडेलवाल, सिनर्जी सायन्स अकॅडमीचे डॉ.दत्ता पोंदे यांच्या हस्ते झाले. खगोल तज्ञ पंकज वैद्य, वैज्ञानिक सुभाष पाडगावकर व करिअर मार्गदर्शक जगदीश कोंगे आदि उपस्थित होते.
सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सावेडी उपनगरातील रावसाहेब पटवर्धन हॉलमध्ये विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आलं होते. शहरातील विविध शाळेंमधील विद्यार्थ्यांनी या विज्ञान जत्रेमध्ये भाग घेऊन आपली उपकरणे सादर केली. यावेळी पाहुण्यांनी प्रत्येक उपकरणास भेट देऊन उपकरणा संदर्भातील माहिती जाणून घेतली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर म्हणाले, मुलांमध्ये असलेली दूरदृष्टी ही पालकांनी देखील शोधली पाहिजे. मोबाईल ही जिवंत सरस्वती असून त्याचा वापर नवनवीन उपक्रम शोधण्याकरिता किंवा शिकण्याकरिता केला पाहिजे. केवळ मोबाईल हे मनोरंजनाचे साधन नसून ते शिक्षणात भर टाकणारे देखील साधन आहे.
डॉ. पियुष खंडेलवाल म्हणाले की मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवणारा असा हा उपक्रम आहे. सिनर्जी सायन्स अकॅडमीचे डॉ. दत्ता पोंदे म्हणाले की यावर्षी विद्यार्थ्यांनी अनेक नाविन्यपूर्ण अशी वैज्ञानिक उपकरणे बनवली आहेत. विविध प्रकारचे रोबोटस, चांद्रयान, स्मार्ट सिटी, जैवतंत्रज्ञान उपकरणे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आहेत. यावेळी डॉ. शिल्पा खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये असलेली आकलन शक्ती जाणून घेण्याची ही एक वेगळी कल्पना आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या आकलनानुसार वेगवेगळी उपकरणे बनवत आहे.
खगोल तज्ञ पंकज वैद्य यांनी स्वतः बनवलेल्या जम्बो दुर्बीणेद्वारे आकाशदर्शन कसे करावे याची माहिती या प्रदर्शनात सादर केली. तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका हेमा कोंगे यांनी देखील विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले तर हेमा कोंगे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com