MP Nilesh Lanke: कांदा व दुध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नसाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन
अहमदनगर :
कांदा व दूधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनावरे बांधत आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल इतकाही दर दुधाला नसल्याने दर द्या, नाही तर फुकट घ्या असा संताप यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
कांदा व दुध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नासाठी खासदार नीलेश लंके रस्त्यावर उतरले आहे. अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढाला. अहमदनगर महापालिकेसमोरून या मोर्चाला सुरूवात झाली. खासदार लंके यांनी थेट बैलगाडीचा दोर हातात घेत मोर्चाचे नेतृत्व केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदेश कार्ले, ठाकरे गटाचे संभाजी कदम, युवासेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रकाश पोटे, दत्ता जाधव, भगवान फुलसौंदर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते.
यावेळी मोर्चामध्ये शेतकर्यांनी राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच दूधाला व कांदाला भाव देण्याची मागणी केली. दूध उत्पादक शेतकर्यांनी थेट गाय, म्हैस आणत या आंदोलनात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येताच पोलिसांनी आंदोलकाना अडवले. यावेळी आंदोलक शेतकरी व पोलिसांमध्ये गोंधळ देखील उडला होता. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर शेतकर्यांनी दणाणून सोडला.
दरम्यान यावेळी पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर आंदोलक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट जनावरे जिल्हाधिकार्यांच्या गेटवर बांधली. त्यानंतर उपस्थित असलेल्या अधिकार्यांना शेतकर्यांच्या दूधाचे वाटप यावेळी आंदोलकांनी केले. दरम्यान यावेळी आंदोलकांनी गायीच्या दुधाला प्रति लिटर ४५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये दर द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात येत होती.
यावेळी सध्या दुधाला मिळणार्या भावामध्ये दुध उत्पादक शेतकर्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नसल्याने शेतकरी मेताकुटीला आलेला आहे. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी परंतू अनुदानाच्या जाचक अटी व शर्तींमुळे शेतकर्यांना त्याचा लाभ होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात येत होता. दरम्यान यावेळी पोलिस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शुक्रवारी दुपारी उशीरा पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोर हे आंदोलन सुरू होते.





0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com