नय्यर विद्यालयाच्या बाल वारकर्‍यांच्या जनजागृतीने दिंडीतील रिंगण सोहळा उत्साहात संपन्न

Pipeline Road: विद्यार्थ्यांना दिंडी परंपरा, वृक्षारोपण अशा सामाजिक जाणिव व्हावी - बापुराव आंधळे




    अहमदनगर (प्रतिनिधी) -    पाईपलाईन रोडवरील बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर व बिशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त परिसरातून विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांच्या वेशभुषेतून आकर्षक दिंडी काढून रिंगण सोहळा साजरा केला.


 याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिव बापुराव आंधळे, संचालक दामोदर सातपुते, जनाबाई पवार, नगरसेविका संध्याताई पवार, प्राथमिक मुख्याध्यापिका मंदा हंडे, मिना जगताप, लक्ष्मण माने, सुधाकर जाधव, एकनाथ मोटे, प्रमोद बडे, मिसाळसर, खेडकर, सांगळे खोसे आदिंसह शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.


     याप्रसंगी बापुराव आंधळे म्हणाले, भारतातच नव्हे तर जगातील सर्व देशामध्ये वृक्ष कमी झाल्याने प्रदुषण वाढले. ही समस्या थांबविण्यासाठी वृक्षलागवड करणे व त्याचे संवर्धन करुन प्रदुषण थांबविणे गरजेचे आहे. यासाठी  नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. 



विद्यार्थ्यांना लहानपणापासून जागृती झाली पाहिजे, ही संकल्पना दिंडीच्या माध्यमातून परिसरातून फलकांद्वारे जनजागृती केली आहे. विद्यार्थ्यांनाही दिंडी परंपरा, वृक्षारोपण अशा सामाजिक जाणिवांची ओळख झाली पाहिजे यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सांगितले.


     प्रारंभी बाळासाहेब पवार यांच्या हस्ते पालखी पुजन करण्यात आले. जनाबाई पवार व नगरसेविका बायजाबाई सोसायटीत या दिंडीचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थी वारकर्‍यांची वेशभुषा, विठ्ठल-रुख्मिणी, संतांची वेशभुषा, डोक्यावर तुलशी वृंदावन, ग्रंथ दिंडी, भगव्या पताका घेऊन जनजागृती फलक व विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता. त्यानंतर शाळेच्या ग्राऊंडवर रिंगण करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी माऊली...माऊली..चा जयघोष केला.


     यावेळी मुख्याध्यापिका मंदा हंडे म्हणाल्या, आपली परंपरा, संस्कृती लहानापासून रुजली पाहिजे. यासाठी अभ्यासबरोबरच सण-उत्सवाचे महत्वही कृतीतून जाणिव करुन दिली जाते. मुलांचा दिंडीतील उत्साह, पर्यावरण, मतदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ सारखे जनजागृती केली असल्याचे सांगितले.


     ही दिंडी शाळेतून निघाल्यानंतर नामदेव चौक, श्रीराम चौक, पाईपलाईन मार्गे बायजाबाई सोसायटी येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात महाआरती करुन दिंडीची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.