MSRTC | जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ३ कोटी महिलांना सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ
अहमदनगर, दि. ३ : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. १२ वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ जिल्ह्यातील ३ कोटी महिलांनी घेतला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू आहे. राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देण्यात येते. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठीदेखील लागू आहे. वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.
महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत;महिला प्रवाशांची संख्या वाढली
महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. या घोषणेच्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून सर्व महिलांना 'महिला सन्मान योजने'अंतर्गत राज्याच्या हद्दीपर्यंत म्हणजेच राज्यांतर्गत धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे ३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असून एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही वाढली आहे.
सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधा, विंडो बुकींग, ऑनलाईन, मोबाईल अॅप, संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार घेण्यात येतो. सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५० टक्के सवलत दिली असल्याने ५० टक्के प्रवास भाडे आकारले जाते. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ. स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तू व सेवाकरची रक्कम आकारण्यात येते.
0000

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com