Satkar | रांजणी गावाने व माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक - वसंत बनकर
अहमदनगर । दर्शक :
नगर- आदर्श शिक्षण व्यवस्था ही कोणत्याही समाजव्यवस्थेचे देशाचे बलस्थान असते. शिक्षकांची भूमिका हि खरे तर माणूस घडविणार्या शिल्पकाराची असते. शिक्षकांमध्ये प्रचंड क्षमता व सामर्थ्य आहे. 1968 ते 1978 या 10 वर्षाच्या काळात रांजणी सारख्या डोंगराळ भागात अध्यापनाचे काम मी केले. त्या काळात जास्त सोयी- सुविधा नसतांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेण्यासाठी धडपड असायची.
शिक्षणातून माणूस घडविण्याच्या प्रयत्न व कर्तव्य मी पार पाडले. त्यामुळे रांजणी गावातून असंख्य मुले उच्चपदावर शिक्षण घेऊन पोहचली. कोणी देशसेवेत, कोणी शासकिय सेवेत, सामाजिक- राजकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मजल मारली. आज रांजणी गावाने, माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त आदर्शशिक्षक वसंत बनकर यांनी केले.
नगर तालुक्यातील रांजणी येथे आदर्शशिक्षक वसंत बनकर यांचा सर्व ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी सन्मान करून कृतज्ञता सोहळा साजरा केला. यावेळी माजी सरपंच नारायण लिपणे, माजी मुख्याध्यापक गंगाधर लांडगे, भास्कर लिपणे, अशोक चेमटे, पाराजी खोमणे, केशव चेमटे, सौ. इंदिरा बनकर, सौ.शकुंतला पोळ, दिनकर थोरात, विजय ठोंबे, चंद्रकांत थोरात, किसन चेमटे, बटू लिपणे, मणसुख पोळ आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री.बनकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, शिक्षक म्हणून मी माझी जबाबदारी पार पडली. 1968 ते 1978च्या प्राथमिक शाळेतून उच्च शिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी स्वत: कष्ट घेतले. जिद्द मनात ठेवून यशाचे शिखर गाठले कोणी मेजर, कोणी शिक्षक, कोणी इतर सेवेत दाखल झाले. त्यांच्या या यशामुळे मी आनंदी आहे. 55 वर्षानंतरही गावच्या लोकांनी व माजी विद्यार्थ्यांनी मला येथे बोलावून माझा जो सन्मान केला या मुळे भारावून गेलो. भाविष्यात तुमच्या हातून अशीच देशसेवा घडावी. चांगली कामे करावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी बोलताना दिनकर थोरात यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. ज्या काळात दळण-वळणाची साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी रांजणी सारख्या डोंगराळ भागात शिक्षक येण्यास तयार नव्हते. अशा वेळी मात्र बनकर गुरुजींनी 11 वर्षेशैक्षणिक सेवा देत कर्तव्य बजावले. त्यामुळेच नैतिक दडपण विद्यार्थ्यांवर आले व आज ते विद्यार्थी यशस्वी झाले. शिस्तप्रिय बनकर गुरुजींमुळे रांजणी गाव सुसंस्कृत शिक्षणामुळे ओळखले जाउ लागले.
यावेळी माजी मुख्याध्यापक गंगाधर लांडगे म्हणाले, शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थी, पालक व शिक्षक अशी त्रिसुत्री असते. गावकर्यांनी साथ दिल्याने बनकर गुरुजींनी चांगले काम केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नारायण लिपणे यांनी केले. सुत्रसंचालन मुकूंद सोनवणे यांनी केले तर आभार भास्कर लिपणे यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com